स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : अतिक्रमणाला खतपाणी घालणाऱ्या पालिकेच्या नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयातील अतिक्रमण विभागाला टाळे लावण्याची लेखी मागणी एमआयएमचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव आणि रायगड व नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये नेरूळ नोडमध्ये पावलापावलावर बकालपणा पहावयास मिळत आहे. महापालिका प्रशासनाची उदासिनता, अतिक्रमणावर कारवाई करण्यास चालढकल, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाणे व्यापलेले पदपथ व रस्ते, दुकान व्यावसायिकांचे मार्जिनल स्पेस सोडून रस्त्यावर थेट झालेले अतिक्रमण, सकाळपासून रात्री उशिरापर्यत फेरीवाल्यांचे व्यवसायासाठी अतिक्रमण, बाराही महिने मोठ्या प्रमाणावर लागणारे अनधिकृत होर्डिग यामुळे महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे,
नेरूळ विभाग कार्यालय हद्दीमध्ये नेरूळ पूर्व आणि पश्चिमेला बाराही माहिने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डींग लागलेले असतात. या होर्डीगवर कारवाई केली जात नाही. होर्डींग अनेक दिवस लोटले तरी पालिका प्रशासनाकडून काढले जात नाही. अनधिकृत होर्डीगमुळे नेरूळ पूर्वेला व पश्चिमेला अंर्तगत तसेच बाह्य भागाला बकालपणा आला असतानाही महापालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. अनधिकृत होर्डींग लावणाऱ्यांमुळे स्वच्छ व सुंदर नवी मुंबईला बकालपणा तर येतोच, पण महापालिकेचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. सारसोळे, कुकशेत, नेरूळ सेक्टर २,४,६,८,१०,१२,१४,१६, १६ ए, १८, १८ए, २४, पूर्व आणि पश्चिमचा स्टेशन रोड, रेल्वे स्टेशनचा दोन्ही बाजूचा परिसर, साईबाबा चौक, सारसोळेतील मच्छिमार्केट सह महापालिकेची उद्याने, क्रिडांगणे, समाजमंदिर सर्वत्रच फेरीवाल्यांनी फुटपाथ बळकावले आहेत. लोकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. राजीव गांधी उड्डाणपुलाखालील दोन्ही बाजूचा परिसर दिवस तसेच रात्री उशिरापर्यत फेरीवाले, खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या असतात. महापालिकेचा अतिक्रमण विभाग बॅनर व पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने याचे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय सर्वसामान्य जनतेकडून उघडपणे व्यक्त केला जात असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे,
नेरूळ विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तसेच विभाग कार्यालय हद्दीत असणाऱ्या गावठाणात दिवसाउजेडी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत. आजही बांधकामे सुरू आहेत. बांधकामाची गुणवत्ता संशयास्पद आहे. अवघ्या काही महिन्यातच चार ते सहा मजले उभे राहत असल्याने हे भविष्यातील मृत्यूचे सांगाडे आहेत. हे सर्व महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागामुळेच घडत आहेत. ते कार्यतत्पर असते तर अनधिकृत इमारतींची बांधकामे झालीच नसती व आजही सुरू आहेत. अनधिकृत बॅनरवर दररोज कारवाई व अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे सातत्याने दाखल केले असते तर अनधिकृत बॅनरचा नेरूळ पूर्व आणि पश्चिम परिसराला विळखा बसलाच नसता. पदपथ जनतेच्या चालण्यासाठी आहे. पण त्यावरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. दुकान व्यावसायिकांनी मार्जिनल स्पेस बळकावत थेट पदपथावरही साहित्य ठेवल्याचे ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाला कामच करायचे नसेल, नेरूळला बकालपणाच आणायचा असेल तर त्या अतिक्रमण विभागाला टाळे लावून त्या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवामुक्तच करणे योग्य आहे. त्यांना आपले काम करायचे नसेल तर पालिका प्रशासनाने हे निरूपयोगी पांढरे हत्ती पोसू नयेत, असे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे,
नेरूळ महापालिका विभाग कार्यालय हद्दीतील सर्व पदपथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त करण्याचे, अनधिकृत बॅनरवर दररोज व्यापक कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे, गावठाणात सुरू असणाऱ्या व नुकत्याच झालेल्या सर्वच बांधकामाची गुणवत्ता तपासण्याचे आणि मार्जनल स्पेस व पदपथावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानचालकांवर कारवाई करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून केली आहे.