स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध स्वरुपाचे प्रयत्न केले जात असून नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापरू नये असे आवाहन करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने १० नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या दिवाळीपूर्वीपासून खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन या कालावधीत प्लास्टिक पिशव्यांना व प्रतिबंधित प्लास्टिकला अटकाव करण्याच्या दृष्टीने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात धडाकेबाज प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. यामध्ये १८३ किलो प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. तसेच १ लक्ष ६५ हजार रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला.
यामध्ये बेलापूर विभागात १२ व्यावसायिकांवर कारवाई करीत ५० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करुन ६० हजार रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला. नेरुळ विभागात एका व्यावसायिकाकडून १ किलो प्लास्टिक जप्त व ५ हजार दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. वाशी विभागात ९ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती व ४० हजार दंड वसूली ७ व्यावसायिकांकडून करण्यात आली. तुर्भे विभागात २ व्यावसायिकांवर कारवाई करीत १० हजार दंडवसूली व ५ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
कोपरखैरणे विभागात १५ हजार दंडात्मक रक्कम वसूलीसोबतच ३ व्यावसायिकांकडून १५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. ऐरोली विभागात अर्धा किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्या जप्ती व ५ हजार दंडात्माक रक्कम वसूली करण्यात आली. त्याचप्रमाणे परिमंडळ १ च्या भरारी पथकाने ४ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती केली व १० हजार दंडात्मक रक्कम २ व्यावसायिकांकडून वसूल केली. तसेच परिमंडळ २ च्या भरारी पथकाने १०९ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले व २० हजार दंडात्मक रक्कम ४ व्यावसायिकांकडून वसूल केली. अशाप्रकारे एकूण ३२ व्यावसायिकांवर कारवाई करीत १८३ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्ती व १ लाख ६५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ बाबासाहेब राजळे, परिमंडळ १ चे उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ चे उपआयुक्त डॉ श्रीराम पवार यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि त्यांच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथकांनी ही कारवाई केली. ऑक्टोबर महिन्यातही २६४ किलो ४६० ग्रॅम प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात येऊन २ लक्ष ९० हजार रक्कमेची दंड वसूली ५८ व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र प्लास्टिकमुक्त असण्याकरिता जागरुकतेने लक्ष देण्यात येत असून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा तीव्रतेने राबविण्यात येत आहेत.