सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपले नामफलक मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिध्द करावेत असे आवाहन महाराष्ट्र दुकाने व आस्थापना(नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) अधिनियम २०२२ अन्वये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी करण्यात आलेले आहे.
या विषयाची मा. सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपले नामफलक २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी देवनागरी भाषेत प्रदर्शित करण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापना यांचे मालक/चालक यांना सूचित करण्यात येते की, याबाबतच्या १६ मार्च २०२२ रोजीच्या अधिनियमातील कलम ३६ क (१) नुसार कलम ६ अन्वये नोंदीत किंवा कलम ७ लागू आहे अशा प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल, अशा आस्थापनांकडे मराठी देवनागरी भाषेसह इतर भाषेतील व लिपीतील नामफलक असू शकतील, परंतू अशावेळी मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहीणे आवश्यक राहील आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यानुसार सर्व दुकाने व आस्थापनांनी आपले नामफलक मराठी देवनागरी भाषेला प्राधान्य देऊन ठळकपणे प्रदर्शित करावयाचे आहेत. याबाबत हलगर्जीपणा आढळून आल्यास अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावयाची आहे.
मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा असून तिचा यथोचित सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापना यांनी आपले नामफलक तात्काळ मराठी देवनागरी भाषेत ठळकपणे प्रसिध्द करावेत असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.