नवी मुंबई : शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती अपेक्षित आहे. शिक्षणाचे ओझे मुलांना वाटता कामा नये आणि त्यामुळे मुलांसाठी शिक्षण ही संकल्पना प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे, असे मत नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या शाळांचे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन कोपरखैरणे येथील महापालिकेच्या सीबीएसई शाळा क्रमांक ९४ मध्ये भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते बुधवारी झाले. याप्रसंगी महापालिकेच्या शिक्षणाधिकारी अरुणा यादव, विस्तार अधिकारी खुशाल चौधरी, समन्वयक संजय मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका अमिता भट्ट शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महापालिका आणि अनुदानित अशा ३५ शाळांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेतला असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विविध वैज्ञानिक प्रकल्प मांडले होते.
अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणवत्ता प्रदर्शित होत असते. विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला संधी मिळत असते, असे सांगून जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळविल्याचे नमूद केले. शिक्षणावर आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांवर शिक्षणाचा दबाव असता कामा नये. मुलांनी व्यक्त व्हायला हवे आणि त्यासाठी आई-वडिलांनी त्यांच्याबरोबर संवाद साधायला हवा. हल्ली मुलांचा संवाद मोबाईल बरोबर अधिक आणि कुटुंबीयांबरोबर कमी असतो याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या टाळायला हव्यात, त्याची सामूहिक जबाबदारी समाजाची असल्याचे ते म्हणाले.