- नवी मुंबई प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शुभारंभ * खेळाडूंची शानदार लिलाव प्रक्रिया संपन्न * १६ संघ आणि २४० खेळाडूंचा सहभाग * नवी मुंबई रत्न पुरस्कारांचे वितरण
नवी मुंबई : अल्पावधीत महाराष्ट्रासह देशात लोकप्रिय ठरलेल्या नवी मुंबई प्रीमियर लीग अर्थात एनएमपीएल स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष तथा ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते वाशी येथे आय लिफ हॉटेलमध्ये नेत्र दीपक समारंभात करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थित एनएमपीएलचे आयोजक, संघमालक, खेळाडू, विविध क्षेत्रातील मान्यवर यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी एनएमपीएलने खेळाच्या माध्यमातून देशामध्ये नवी मुंबईचा लौकिक वाढविला आहे, असे गौरवोद्गार काढले. या स्पर्धेच्या मैदानावर नवी मुंबईतील शहर, गाव, गावठाण, झोपडपट्टी अशा सर्वच स्तरातून आलेल्या क्रिकेटपटूंचे सांघिक दर्शन घडते. नवी मुंबई शहराला एकत्र करणारी अशी ही स्पर्धा आहे. ४० प्लस खेळ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन एनएमपीएल सुरू केल्याचे संदीप नाईक म्हणाले. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी स्थानिक क्रिकेटपटूंना लाभते तर या स्टार क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी स्थानिक क्रिकेट प्रेमींना मिळते. वर्णभेद नको, अमली पदार्थ नको अशा प्रकारच्या सामाजिक संदेश देणाऱ्या थीम घेऊन आतापर्यंत ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे. यावर्षी ‘हेल्दी नवी मुंबई, फिट नवी मुंबई’ ही थीम घेण्यात आली आहे.
नवी मुंबईतील स्थानिक टेनिस बॉल क्रिकेटपटूंना त्यांची गुणवत्ता प्रदर्शित करण्यासाठी एक भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या सहकार्याने नवी मुंबई प्रीमियर लीगची सुरुवात पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद लाभतो आहे. यावर्षी सोळा मातब्बर संघांनी सहभाग नोंदवला असून २४० क्रिकेटपटूंचा दर्जेदार खेळ पहावयास मिळणार आहे. १७ जानेवारी ते २१ या कालावधीमध्ये कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानावर या लीग मधील खेळाचा थरार नवी मुंबईकर क्रीडा रसिकांना अनुभवता येणार आहे. एनएमपीएलच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक लीलाधर नाईक, एनएमपीएल कमिशनर दीपक पाटील, स्वप्निल नाईक, ओमकार नाईक, निलेश पाटील, प्रतीक पाटील, माजिद बलोच , महेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, सुनंदा कोळी शाबाजकर, बाबू सुतार, विकी भोईर, भूषण पाटील, समालोचक कुणाल दाते, विघ्नेश मढवी आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट…
एनएमपीएलच्या शुभारंभ प्रसंगी दरवर्षी विविध क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा नवी मुंबई रत्न पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येतो. यावर्षी अध्यात्माची परंपरा समर्थपणे पुढे नेणारे भजन सम्राट महादेव बुवा शाबाजकर, आयपीएल गाजवणारा क्रिकेटपटू अमन खान, टेनिस बॉल स्टार क्रिकेटपटू भूषण पाटील आणि संस्कृती आणि परंपरा जपणारे दिवाळे ग्रामस्थ बहिरी देव मंडळ यांना नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या शुभहस्ते नवी मुंबई रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. बहिरी देव मंडळाच्या वतीने विकास कोळी आणि नीरज कोळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
चौकट…
हेल्दी नवी मुंबई फिट नवी मुंबई
यंदा एनएमपीएल ही स्पर्धा ‘ हेल्दी नवी मुंबई फिट नवी मुंबई ‘ या संकल्पनेच्या माध्यमातून खेळवली जाते आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास आणि अन्य विविध कारणांमुळे नैराश्य आलेले दिसते. हे नैराश्य दूर करण्यासाठी मुलांचा पालकांसोबतचा, शिक्षकांबरोबरचा आणि समाजासोबतचा संवाद चांगला राहिला पाहिजे, असे मत जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे. मुलांपेक्षा पालकांचे समुपदेशन गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. खेळाच्या माध्यमातून याबाबतची जनजागृती उत्तम प्रकारे होऊ शकते. या अनुषंगाने येत्या काळात विविध जनजागृती पर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी दिली.