नवी मुंबई : गृहनिर्माण सोसायटी, एलआयजी, चाळी, माथाडी वसाहती, झोपडपट्टीच्या अंर्तगत भागातही धुरीकरण करण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव आणि रायगड नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहर दिघा ते बेलापुरदरम्यान विस्तारलेले आहे. या शहरात रस्त्यावरच्या गरीबांपासून ते गर्भश्रीमतांपर्यत सर्वांचेच टॉवर, उच्चभ्रुंच्या इमारती, गृहनिर्माण सोसायटी, एलआयजीच्या चाळी, माथाडी वसाहती, झोपडपट्टी, खाण परिसर या ठिकाणी निवासी वास्तव्य आहे. नवी मुंबईकरांना प्रत्येकालाच डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. डासांमुळे नवी मुंबईकरांना विविध साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. बाराही महिने नवी मुंबईकरांना साथीच्या आजारांमुळे डॉक्टर, हॉस्पिटल, दवाखान्याचा खर्च करावा लागत असल्याचे हाजी शाहनवाज खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाकडून डास नियत्रंणासाठी धुरीकरण करण्यात येत असते. परंतु हे धुरीकरण रस्त्यावर करण्यात येते, गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाहेरच्या भागात करण्यात येते. त्यामुळे डास नियत्रंणावर मर्यादा पडतात. डासांचा उद्रेक व साथीचे आजार याचे प्रमाण कमी होत नाही. महापालिका प्रशासनाने अंर्तगत भागात धुरीकरण केल्यास डासांचे व साथीच्या आजारांचे प्रमाण कमी होईल. डास नियत्रंणासाठी गृहनिर्माण सोसायटी, एलआयजी, चाळी, माथाडी वसाहती, झोपडपट्टीच्या अंर्तगत भागातही धुरीकरण करण्याचे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे.