नवी मुंबई : कमी दाबाने तसेच दूषित पुरवठा होत असलेल्या पाण्याचे देयक न आकारण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव व रायगड-नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ, सानपाडा व जुईनगरचे रहीवाशी गेल्या काही महिन्यापासून पाण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. स्वमालकीचे मोरबे धरण असतानाही येथील रहीवाशांना सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेरूळ व जुईनगरच्या रहीवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या दूषित पाण्यामुळे रहीवाशांना जुलाब होणे, उलट्या होणे, ताप येणे अशा आजारांचा सामना करावा लागत असून घरामध्ये दोन ते तीन जण आजारी आहेत. दूषित पाण्यामुळे जिवितास धोकाही निर्माण झालेला असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
नागरिकांना एकतर मोरबे धरण असतानाही कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे आजारावरील उपचारासाठी पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यत महापालिका प्रशासनाला माफक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देता येत नाही व दूषित नाही तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे जमत नाही, तोपर्यत पाण्याचे बिल रहीवाशांना आकारू नये. दूषित पाण्याचे महापालिका का बिल आकारात आहे? बिल नका आकारू. रहीवाशांना उपचारासाठी खर्च झालेले पैसे महापालिकेने देणे आवश्यक आहे. त्यामुळे कमी दाबाने तसेच दूषित पुरवठा होत असलेल्या पाण्याचे देयक आकारू नये अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.