सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : न्हावा शेवा (पारबंदर) प्रकल्पाच्या कामास विलंब केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच न्हावा शेवा प्रकल्पावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना माफक स्वरुपात टोलआकारणी करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
न्हावा-शेवा (पारबंदर) प्रकल्पाचे लवकरच लोर्कापण होत आहे. या प्रकल्पाचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांच्या माध्यमातून झालेले आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो लि., आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कंपनी लि. कंसोशिअम, मे. देवू इंजिनिअरींग अॅण्ड कंन्स्ट्रक्शन लि.,टाटा प्रोकेल्टस लि. जेव्ही, स्ट्रॉबॅग इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड सेफ्टी सोल्यूशन्स जीएमबीएच जेव्ही अशा विविध कंपन्यांनी टप्याटप्याने काम केले आहे. या सर्वच ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीत काम न केल्याने कामास विलंब झालेला आहे. तसेच प्रकल्पाच्या खर्चात तब्बल २१९२ कोटी रुपये अतिरिक्त खर्च झालेला आहे. हा खर्च संबंधित ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण न केल्याने सरकारला भुर्दंड सोसावा लागलेला आहे. त्यामुळे कामास विलंब आणि दोन हजार कोटींचा भुर्दंड यामुळे सरकारकडून या प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना राज्य सरकारने तातडीने काळ्या यादीत लवकरात लवकर टाकणे आवश्यक आहे, तशी कारवाई तातडीने करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांना निवेदनातून केली आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई ते थेट न्हावा सेवा, पनवेल-उरण या दरम्यान नागरिकांना कमी वेळेत दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. मात्र ही सुविधा सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली. त्यावर सरकारने भरमसाठ टोल आकारू नये. सर्वसामान्यांना परवडेल असाच टोल आकारावा आणि टोल कमी कालावधीकरता असेल यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. मुंबई-पुणे महामार्गासारखा अनेक वर्षे टोलचा भुर्दंड या महामार्गावरून सहन करावा लागू नये यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.