शितल भालेराव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून महापालिका रुग्णालय, माता बाल रुग्णालयात सुपर फॅसिलिटी सुविधा मिळाव्यात तसेच फोर्टीज रुग्णालयातील डॉक्टर व तेथील वापरल्या जाणाऱ्या मशिनरीची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
महापालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांवर आरोग्य विभागाकडून उपचार करण्यात येतात. गंभीर आजार असल्यावर महापालिका प्रशासन रुग्णांवर उपचारासाठी फोर्टीजच्या डॉक्टरांना बोलावून घेतात. फोर्टीजच्या मशिनरी वापरल्या जातात. पण फोर्टीजच्या डॉक्टरांना त्यांची फी द्यावी लागते, तसेच वापरलेल्या मशिनरीबाबत शुल्क आकारले जाते. हे शुल्क सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचे असते. मुळातच महापालिका प्रशासनाने हिरानंदनी हेल्थ केअर प्रा. लि.सोबत झालेल्या करारानुसार महापालिका प्रशासनाने रुग्णालयीन उपचाराची सुपर फॅसिलिटी सुविधा मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाने आपली जागा हिरानंदनी हेल्थ केअरला भाडे तत्वावर दिली. त्यावेळी झालेल्या कराराप्रमाणे महापालिका रुग्णालयातील रुग्णांना हिरानंदानीने सुपर फॅसिलीटी अर्थात सर्वेात्तम सुविधा देणे बंधनकारक आहे. हिरानंदानी हेल्थ केअरने जागा मिळविण्यासाठी करार केला, मात्र या कराराची अंमलबजावणी केली जात नाही, ही नवी मुंबईकरांची शोकांतिका असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
एकादा रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर संबंधित रुग्णास हार्ट अथवा किडनीची समस्या निर्माण झाल्यास त्या रुग्णावर उपचारासाठी फोर्टीजच्या डॉक्टरांना बोलवले जाते. मात्र या डॉक्टरांना त्यांची फी रुग्णांना द्यावी लागते. एकतर अशा घटनेत फोर्टीजने मोफत उपचार करावेत अथवा त्या उपचाराचे पैसे महापालिका प्रशासनाने भरणे आवश्यक आहे. हिरानंदानी हेल्थ केअरशी झालेल्या कराराप्रमाणे पालिका रुग्णालयातील रुग्णांना एकतर फोर्टीजने मोफत उपचार करावेत अथवा फोर्टीजच्या खर्चाचे देयक महापालिका प्रशासनाने भरणे आवश्यक आहे. फोर्टीज रुग्णालय हिरानंदानी हेल्थ केअरशी झालेल्या कराराप्रमाणे मोफत उपचार मिळणे आवश्यक आहे. कराराची अंमलबजावणी होत नसल्याने पालिका प्रशासनाने याबाबत कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका रुग्णालयातील रुग्णांना उपचारासाठी फोर्टीजच्या डॉक्टरांना बोलविले जाते. मशिनरीची गरज लागल्यास फोर्टीजच्या रुग्णालयात घेवून जातात, मात्र ही सेवा सशुल्क आहे. महापालिकेत उपचारासाठी दाखल केलेल्या सर्वसामान्य रुग्णांना न परवडणारी आहे. या गोष्टीला कोठेतरी आळा बसला पाहिजे. हिरानंदानी हेल्थ केअरने पालिका प्रशासनाशी आरोग्याबाबत केलेल्या कराराची अंमलबजावणी केली पाहिजे यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलली पाहिजेत. पैसे नसल्याने रुग्ण पालिका रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्यांच्यावर उपचार करणे पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. फोर्टीजचे डॉक्टर उपचार करण्यासाठी येत असतील अथवा फोर्टीजच्या रुग्णालयातील मशिनरी वापरल्या जात असतील तर त्याचे नाममात्र शुल्क आकारण्यात यावे अथवा पालिका प्रशासनाने ते शुल्क भरावे. फोर्टीजचे डॉक्टर अवाजवी पैसे आकारत असतील तर त्याबाबत रुग्णांना दाद मागता यावी यासाठी पालिका प्र्रशासनाने संबंधितांकरता एक अधिकारी वर्ग रुग्णालयात उपलब्ध करून द्यावा. फोर्टीजच्या माध्यमातून पालिका रुग्णांवर उपचार केले जात असतील तर त्या रुग्णांना अत्यल्प दरात उपचार व्हावेत अथवा तो खर्च पालिका प्रशासनाने करावा यासाठी आपण संबंधितांना निर्देश देवून नवी मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.