नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील पालिका उद्यान व क्रिडांगणातील समस्या सोडवून बकालपणा घालविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर ६ परिसरातील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आणि नरवीर तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. महापालिकेने हे क्रिडांगण व उद्यान निर्माण केल्यापासून पालिका प्रशासनाचे येथे लक्ष नसल्याने या ठिकाणी असुविधा, समस्या, बकालपणा बाराही महिने पहावयास मिळतो. कदाचित नवी मुंबईत राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानातून नेरूळ सेक्टर सहा परिसर वगळला असल्याने स्थानिक रहीवाशांना या उद्यानाची व क्रिडांगणाची देणगी लाभलेली आहे. महापालिका प्रशासन लाखो रुपयांची कंत्राट देवून उद्यान व क्रिडांगणात कामे करवून घेते. पण ही कामे कागदोपत्रीच अधिक असतात. अथवा झालीच तरी लाखोंची बिले घेवून काही हजारांची कामे या उद्यान व क्रिडांगणात केली जातात. कामाबाबत विचारणा केल्याची असंख्य निवेदने पाठवूनही पालिका प्रशासन दखल न घेता संबंधित ठेकेदारांचीच पाठराखण करत आहे. त्यामुळे परिसरात विकासकामांचे फलक न लावता, ठेक्यात नमूद असलेली कामे न करता वेगळीच कामे करणे, ठेक्याची मुदत संपल्यावर संबंधिताला काळ्या यादीत न टाकता कितीही विलंबाने कामे झाली तरी त्याचे बिल देणे असले प्रकार महापालिका प्रशासन नेरूळ सेक्टर सहाच्या बाबतीत करत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
उद्यान व क्रिडांगण महापालिका प्रशासनाने शाळेसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर बनविले आहे. आज आपण उद्यानात आल्यावर झोपाळा तुटलेला पहावयास मिळेल. उद्यान व क्रिडांगण उंदरांनी पोखरले असून जागोजागी खड्डे पहावयास मिळतात. एव्हरग्रीन सोसायटीच्या बाजूने असलेले छोटेखानी लोखंडी प्रवेशद्वार गायब झाले असून त्याठिकाणी पालापाचोळा व अन्य कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळत आहे. नेरूळ सीव्ह्यू या सिडको सोसायटीच्या लगतच क्रिडांगणाची संरक्षक भिंत आहे. या भिंतीजवळच कोठेतरी महापालिकेचा नळ तुटला असून ते सर्व पाणी क्रिडांगणात येत असून क्रिडांगणात चिखल झालेला आहे. क्रिडांगणावर पेव्हर ब्लॉकचे ढिगारे पडले आहेत.च उद्यान व क्रिडांगणात मॉर्निग वॉक बनविले आहे, तेथील लाद्या उद्यान व क्रिडांगण झाल्यापासून बदलण्यात आलेल्या नाही. त्या ठिकठिकाणी तुटलेल्या आहेत. आपणास सर्व समस्यांची छायाचित्रे पाठवित आहोत. ज्रेणेकरून आपणास समस्येचे गांभीर्य लक्षात येईल आणि येथील समस्या समजून घेता येतील. या उद्यान व क्रिडांगणात लाखो रुपयांची विकासकामे एकतर कागदावर होतात अथवा काही हजारांची किरकोळ कामे थुकपट्टी लावली जाते. कोठेही विकासकामांचे फलक ठेकेदार लावत नाही. त्यामुळे रक्कम व कामाचे स्वरूप स्थानिकांना समजत नाही. हे चित्र आता कोठेतरी थांबले पाहजे? अजून किती काळ याच उद्यानात व क्रिडांगणावर स्थानिकांनी समाधान मानायचे? आपण संबंधितांना या क्रिडांगणातून पेव्हर ब्लॉकचे ढिगारे हटविणे, एव्हरग्रीनच्या प्रवेशद्वारापाशी असलेला कचऱ्याचा ढिगारा हटविणे, तुटलेल्या झोपाळ्याची दुरुस्ती करणे, तुटलेल्या नळाची दुरूस्ती करून क्रिडांगणात चिखल होणार नाही याची दक्षता घेणे या समस्या निवारणासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.