एमआयएमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव – जुन्नर मार्गावरील पिंपळगाव फाट्यावरील कै. उत्तम विष्णू खांडगे व चंद्रकांत विष्णू खांडगे या शेतकऱ्यांच्या शेतामधील तब्बल ४२ गुंठे जमिनीवर कोणत्याही प्रकारचे भूसंपादन न करता सरकारने अतिक्रमण करत रस्ता डागडूजी केली आहे. पोलिसी बंदोबस्तात पिंपळगावच्या सरपंचांनी खांडगे कंपनी केस हारले असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर (यूट्यूब) पसरवत अतिक्रमणात महत्वाची भूमिका बजावली आहे. या धसक्याने उत्तम विष्णू खांडगे यांचे ८ ऑक्टोबर २०२३ ला निधन झाले आहे. दुसरे शेतकरी चंद्रकांत विष्णू खांडगे हे गेल्या १५ दिवसांपासून वाशीतील फोर्टीस रुग्णालयात सिरीयस आहेत. तरी विनाभूसंपादन शेतातील अतिक्रमण तातडीने हटवून हे अतिक्रमण करणाऱ्या जिल्हा परिषद अधिकारी आणि पिंपळगावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. वऱ्हाडी मळा येथून जुन्नरकडे जाणाऱ्या अधिकृत रस्त्याची ( या रस्त्याची कागदोपत्री नोंद आहे व भूसंपादनही झालेले आहे) डागडूजी करावी व विनाभूसंपादन पोलीसी बळावर झालेले ४२ गुंठे शेतावरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी एमआयएमचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबईचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
विनाभूसंपादन शेतीवर शासकीय अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या परिवाराला न्याय मिळणार काय? कोणत्याही प्रकारचे भूसंपादन न करता शेतावर अतिक्रमण करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? न्यायालयात केस सुरू असतानाही शेतकरी परिवार केस हरल्याचे सोशल मिडियावर (यू ट्यूब) अफवा पसरवणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचावर फौजदारी गुन्हा लवकरात लवकर दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
विनाभूसंपादन शेतातील तब्बल ४२ गुंठे जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी व संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी हाजी शाहनवाझ खान हे गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्र्यांकडे लेखी पाठपुरावा करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव (आर्वी) येथील कै. उत्तम विष्णू खांडगे (७६ वर्षे वय), चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७०) या दोन शेतकऱ्यांच्या नारायणगाव-जुन्नर रोडवरील गट क्रमांक ३०८/१ शेतात अतिक्रमण झाले असून कोणत्याही प्रकारचा मोबदला या शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. २०१३-१४ सालीही धाकधपटशा व दंडेलशाहीच्या बळावर प्रशासनाने या दोन भावाच्या शेतात अतिक्रमण करून पायवाटेचे मोठ्या रस्त्यात रूपांतर करून डांबरीकरण केले होते. या रस्त्याची कोठेही प्रशासन दरबारी नोंद नाही. गावात तीन शासकीय रस्ते याअगोदरच नारायणगाव –जुन्नरला उपलब्ध असून या दोन शेतकऱ्यांच्या जमिनीत काही घटकांनी दडपशाही करून या दोन शेतकऱ्यांच्या तब्बल ४२ गुंठे जमिनीचे नुकसान करण्यात आलेले आहे. भूसंपादन केले नसल्याची कबुली प्रशासन देत आहे. दोघे शेतकरी बंधू आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्यायालयीन पातळीवर संघर्ष करत आहेत. भूसंपादन नाही, शेतकऱ्यांना मोबदला नाही. कागदावर या रस्त्याची नोंद नाही. सर्व बेकायदेशीर असतानाही या दोन शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुन्हा एकवार जिल्हा परिषद डागडूजी करत असल्याचा प्रकार हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
नारायणगाव-जुन्नर रोडवरील १) उत्तम विष्णू खांडगे २) चंद्रकांत विष्णू खांडगे यांच्या पाच एकर जमिनीवर ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी व ठेकेदार यांनी भूसंपादन न करता पोलीसी ताकदीवर रस्ता बनविला आहे. या दोघा शेतकऱ्यांचे वडील कै. विष्णू भागोजी खांडगे यांनी १९६५ ला जमिन विकत घेतली, त्यावेळी कागदावर रस्ता नव्हता व आजही कागदावर रस्त्याची नोंद नाही. या शेताचे सरकारने आजतागायत कोणत्याही प्रकारचे भूसंपादन केलेले नाही. शेतकऱ्यांना एक पैशाचाही मोबदला न देता गावचे पुढारी दहशतीच्या बळावर या दोन शेतकऱ्यांच्या जमिनीवर वर्षानुवर्षे अतिक्रमण करत आहेत. गावपुढाऱ्यांच्या दहशतीमुळे या दोन शेतकरी परिवाराचे मानसिक संतुलन ढासळले आहे. यातील एक शेतकरी उत्तम विष्णू खांडगे यांचे गावपुढाऱ्यांच्या दहशतीमुळे आणि शेतात विनाभूसंपादन पोलीसी पाठबळावर व सोशल मिडियावर सरपंच व ग्रामसेवल खोटी माहिती देवून गावाची दिशाभूल करत असल्याने ८ ऑक्टोबर २०२३ रोजी निधन झाले आहे. स्वत:च्या शेतात पोलिसी पाठबळावर सरपंव व ग्रामपंचायत सदस्यांनी या दोघा शेतकऱ्यांच्या शेताचे तीन तेरा वाजले आहे. शिवाय गावपुढारी सतत रस्त्यावरून ये-जा करत असल्याने या परिवाराच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.
अनधिकृतरित्या झूडशाहीच्या बळावर व काही ग्रामस्थांच्या राजकीय ओळखी व मंत्रालयीन ओळखीवर बनविला जात असून आता खोटी कागदपत्रेही बनविली जाण्याची भीति आहे. आता गावपुढारी १९६५ पूर्वी या रस्त्याला पूर्वीच्या मालकाने परवानगी दिल्याचे खोटे सांगत आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. आजही सुनावणी होत आहे. तथापि पोलिसी बळावर रस्ता काम सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य व सरपंच केस आम्ही जिंकलो आहोत, खांडगे कंपनी केस हरली आहे, असे सांगत न्यायप्रविष्ठ प्रकरणात प्रसिद्धी माध्यमांची व ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे धाडस दाखवित आहेत. राज्य सरकारने न्यायालयात केस सुरू असतानाही केसबाबत सोशल मीडियावर (यूट्यूब) खोटी माहिती देवून अफवा पसरविणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. वास्तविकपणे या शेतकऱ्यांच्या शेतातून तब्बल ४२ गुंठ्याची नासाडी करत विनाभूसंपादन करत रस्ता बनविला होता. गावपुढारी रस्ता बनवित असताना पोलीस घेवून हजर असतात. पोलीस त्यांना संरक्षण देत शेतकऱ्यांच्या परिवाराला दमदाटी करत असतात. कोर्टात जा, तिथे काय करायचे ते करा, अशी दमदाटी करत असतात.
दि. ३० मे २०२३ रोजी पोलीस पाठबळावर गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केस जिंकल्याचे खोटे सांगत व जिल्हा परिषद अधिकारी भूसंपादन झाले नसल्याचे बेधडक सांगत शेतकरी परिवाराचे खच्चीकरण करत होते. रस्त्याचे काम सुरू असताना वयोवृद्ध शेतकरी उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) जीव तोडून या शेताचे भूसंपादन नाही, एक रूपयाचा मोबदला नाही. तब्बल ४२ गुंठे जागेवर पोलिसी बळावर अतिक्रमण झाले आहे. असे सांगत होते. (यापूर्वीही २०१३-१४ दरम्यान झुंडशाहीच्या बळावर वयोवृद्ध शेतकऱ्यांना न जुमानता रस्त्याचे डांबरीकरण केले होते.) या रस्ता कामामुळे उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) शेतात पाणी साचून पिके वाया जाण्याची व जमिनी भिजाट होण्याची शक्यता आहे. या शेतातील अतिक्रमणामुळे गावपुढाऱ्यांच्या दहशतीचा धसका घेतल्याने उत्तम विष्णू खांडगे यांचे निधन झाले असून त्यांचा परिवार पोरका झाला आहे. दुसरे शेतकरी चद्रकांत विष्णू खांडगे यांनीही शेतात होत असलेल्या अतिक्रमणाचा व गावपुढाऱ्यांच्या दहशतीचा धसका घेतल्याने नवी मुंबईतील वाशी येथील फोर्टीज रूग्णालयात गेल्या २० दिवसांपासून आयसीयूत आहेत. शासकीय अतिक्रमणामुळे या दोन परिवाराची वाताहत झाली आहे. शेतात अतिक्रमण कायम आहे. गावपुढारी या घरांचा होत असलेला तमाशा पाहत आहे. गेली सहा महिने या शेतकऱ्यांच्या घरापुढे ग्रामपंचायतीची वीज नाही. बल्ब बदलले जात नाही. या एका परिवारातील विधवा महिला रत्नप्रभा उत्तम खांडगे यांना रात्री अंधारात ठेवणऱ्यात गावपुढारी किती असूरी आनंद घेत असतील, याची कल्पनाही करवत नाही. ग्रामपंचायत सदस्यांना या परिवारातील अनेकांनी वीज नसल्याची तक्रार केली असतानाही सहा महिने नवीन बल्ब बसविले जात नसल्याने व एका शेतकरी परिवाराकडे एक रूपयाचीही ग्रामपंचायतीकडे थकबाकी नसताना जाणिवपूर्वक अंधारात ठेवले जात असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
खांडगे परिवार न्यायासाठी न्यायालयात लढत असून आता अतिक्रमणावर होत असलेल्या डांबरीकरणामुळे शेतात पाणी साचेल, पाण्याचा निचार न झाल्यास शेताचे तळे होवून जमिनी भिजाट होतील, पिके निघणार नाहीत , पोलिसी बळावर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य या शेतकऱ्यांच्या भूसंपादन न झालेल्या व एक पैशाचाही मोबदला न मिळालेल्या ४२ गुंठे जमिनीवर अतिक्रमण आजही होत आहे. लवकरच डांबरीकरण होण्याची दाट शक्यता आहे. या शेतातून पाणी जाण्यासाठी रस्ता पूर्ण होण्यापूर्वी पाइप टाका, पाणी निघून जाईल अशी हात जोडून वयोवृद्ध शेतकरी कंत्राटदाराला, जेसीपी चालकाला हात जोडून विनवणी करत होते, तर संबंधित मंडळी लेखी द्या असा दबाव या शेतकऱ्यांवर आणत होते, असे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
कै. उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) या दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे जागेचे भूसंपादन न होता एक पैशाचाही मोबदला न मिळता ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद अधिकारी वाटोळे करत आहेत. उद्या या शेतात पाणी साचून राहील्यास, पिकांचे नुकसान झाल्यास तसेच पाण्याचे तळे होऊन जमिन भिजाट झाल्याने शेतीचे नुकसान झाल्यास विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, रस्ते कामाचा कंत्राटदार आणि जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन या शेतकऱ्यांच्या ४२ गुंठे जागेची आणि उर्वरित साडे चार एकर जमिनीच्या भिजाट जमिनीची नुकसान भरपाई देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत आणि ठेकेदाराला तात्पुरते रस्त्याच्या मध्यभागी ठिकठिकाणी पाणी जाण्यासाठी पाइप टाकण्याचे युध्दपातळीवर निर्देश द्यावेत. या घटनेमुळे कै. उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) या वयोवृद्ध शेतकऱ्यांचे परिवार भीतीच्या छायेखाली व मानसिक ताणाखाली वावरत आहेत. या वयोवृद्ध शेतकऱ्यांना व त्यांच्या पत्नीला विविध आजार आहेत. त्यामुळे या घटनेचा व गावपुढाऱ्याच्या दहशतीखाली पोलिस बंदोबस्तात भूसंपादन न झालेल्या जागेवर व एक पैशाचाही मोबदला न मिळता अतिक्रमण होत आहे. न्यायालयीन प्रकरण खटला सुरू असून जुलै महिन्यात आगामी तारीख आहे. तरीही केस जिंकल्याचे सांगत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य खुलेआमपणे प्रसिद्धी माध्यमांना खोटी माहिती देत आहेत. या प्रकरणात उत्तम खांडगे यांचा धसक्याने मृत्यू झाला असून अजून कोणी दगावल्यास त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य जबाबदार राहतील. आपण संबंधित कै. उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीवरील विनाभूसंपादन शासकीय अतिक्रमण काढण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. पोलीस बंदोबस्तात विना भूसंपादन शेतात अतिक्रमण करणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
या सरपंचाच्या घराजवळून जुन्नरकडे जाणारा रस्ता अधिकृत आहे. या रस्त्याची कागदोपत्री नोंदही आहे. भूसंपादन झालेले आहे. तथापि या ठिकाणी रस्ता न बनविता केवळ राजकीय पाठबळावर व मंत्री गिरीश महाजन यांच्या बंदोबस्ताला गावातील एक पोलीस अधिकारी असल्याने हा दडपशाहीचा प्रकार सुरु आहे. सरपंचाच्या घराजवळील भूसंपादन झालेल्या रस्त्याची डागडूजी करण्यात यावी. हा रस्ता थेट जुन्नरपर्यत जातो. हा रस्ता अधिकृत आहे. भूसंपादन झालेले आहे. आपण याप्रकरणी लवकरात लवकर संबंधितांना निर्देश देवून कै. उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) या वयोवृद्ध शेतकऱ्यांवर झालेला अन्याय पाहता आपण विषयाचे गांभीर्य समजून घ्यावे आणि हे अतिक्रमण हटविण्याचे जिल्हा परिषदेला निर्देश द्यावेत. तसेच १) विनाभूसंपादन शेतीवर शासकीय अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या परिवाराला न्याय मिळणार काय?
२) कोणत्याही प्रकारचे भूसंपादन न करता शेतावर अतिक्रमण करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
३) न्यायालयात केस सुरू असतानाही शेतकरी परिवार केस हरल्याचे सोशल मिडियावर (यू ट्यूब) अफवा पसरवणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचावर फौजदारी गुन्हा लवकरात लवकर दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करणेबाबत संबंधितांना निर्देश देवून आपण जनकल्याणकारी मुख्यमंत्री आहात, हे कृतीतून दाखवून द्यावे, अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.