नवी मुंबई : न्हावा शेवा शिवडी अटल सेतूवरील टोल माफक म्हणजे २५० रुपयांऐवजी १०० रुपये ठेवण्याची मागणी एमआयएमचे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न्हावा शेवा सी लिंक अटल सेतूचे लोर्कापण करण्यात आले. या मार्गामुळे कोकणात-गोव्यात जाण्यासाठी व तेथून मुंबईला येण्यासाठी मुंबईकरांच्या वेळेत बचत होणार आहे. वाहतुक कोंडी नसल्याने इंधनाचीही बचत होणार आहे. परंतु या मार्गावर एका वेळेस जाण्यासाठी लावण्यात आलेला २५० रुपये टोल हा खुपच आहे. सरकार सेवा सुविधा देण्यासाठीच असते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आजही टोलचा भुर्दंड वाहनचालकांना भरावा लागत आहे. आजवर अब्जावधी रुपये वाहनचालकांनी या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भरले असतील. याचा खर्चही वसूल होवून कित्येक पट नफाही झाला असेल. सी लींक अटल सेतूवर एका वेळेसाठी लावण्यात आलेला २५० रुपये टोल हा अन्यायकारक व अवाजवी स्वरूपातील भुर्दंड आहे. टोल कधीही कमी होत नाही, तो वाढतच जातो, वर्षानुवर्षे भरावाच लागतो. त्या पार्श्वभूमीवर आपण वाहनचालकांचा विचार करुन टोलबाबत पुर्नविचार करणे आवश्यक आहे. २५० रुपयांऐवजी टोल १०० रुपये आकारावा. २५० रुपये एका वेळेस टोल भरावा लागत असल्यास सर्वसामान्य वाहनचालक या अटल सेतूवरून जाणार नाहीत. या न्हावा शेवा सी लिंक अटल सेतूचा वापर केवळ श्रीमतांपुरताच सिमित राहील. सर्वसामान्यांना या मार्गावरून ये-जा करणे शक्य होणार नाही. तरी आपण याबाबत गंभीरपणे विचार करून न्हावा शेवा शिवडी सी लिंक अटल सेतूचा टोल केवळ शंभर रुपये करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.