नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’मध्ये नवी मुंबई महापालिकेला देशात तिसऱ्या क्रमाकांचा तर राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळालेला आहे. या यशाचे खरे श्रेय पालिका आयुक्त, अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच जात असल्याचे सांगत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे अभिनंदन केले आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’मध्ये राज्यात प्रथम व देशामध्ये तिसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार नवी मुंबई महापालिका प्रशासनाला मिळालेला आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. या पुरस्काराचे खरे श्रेय हे महापालिका आयुक्त आणि महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आहे. ज्या प्रशासनाच्या नेतृत्वाची धुरा दुरदृष्टी असलेल्या सक्षम कर्तृत्वान व्यक्तिकडे असते, त्या शहराच्या विकासाचा अश्वमेध कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे या यशाचे खरे शिल्पकार व श्रेयाचे हक्कदार हे केवळ आणि केवळ महापालिका आयुक्त, त्यांचा अधिकारी वर्ग व कर्मचारीच असल्याचे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.
महापालिका प्रशासनाकडून वेळावेळी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. प्रकल्पाची उभारणी केली जाते. योजनांची अंमलबजावणी केली जाते. सुविधांची गतीमानरित्या उपलब्धता करून दिली जाते. समस्यांचे निवारण केले जाते. स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. स्वच्छतेचा आग्रह दोन्ही बाजूने असणे आवश्यक आहे. प्रशासन स्वच्छतेबाबत आग्रही असताना नवी मुंबईकरांकडूनही स्वच्छतेबाबत तितकेच आग्रही असणे आवश्यक आहे. आपले घर स्वच्छ ठेवताना घरासभोवताला, गृहनिर्माण सोसायटीचा आतील व बाहेरील परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कोरोना काळातही महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्याने व उपचारात कोठेही कसर न ठेवल्याने कोरोना महामारीचा उद्रेक झाला नसल्याचे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाला यापूर्वीही राज्यात व केंद्रात सातत्याने पुरस्कारांचा वर्षांव झालेला आहे व यापुढेही होत राहणार. पुरस्कार ज्यांच्यामुळे मिळाला, त्या कामगारांचा विसर पालिका प्रशासनाला होता कामा नये. कर्मचाऱ्यांनाही सुविधा मिळाल्या पाहिजेत , त्यांच्याही समस्या सुटल्या पाहिजेत. या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’मध्ये मिळालेल्या सुयशाबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त, पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नवी मुंबई कॉंग्रेसकडून अभिनंदन करताना रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.