स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbilive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेलसह रायगड व ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील कंपन्या व कारखान्यांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त व अल्पसंख्यांकाना गुणवत्तेनुसार भरतीमध्ये सामावून घेण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी एमआयएमचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडी , महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई, पनवेलसह रायगड व ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे व कंपन्या आहेत. या कंपन्या व कारखान्यांमध्ये अन्य राज्यातून येणाऱ्यांना ताबडतोब नोकऱ्या मिळत आहेत. महाराष्ट्राच्या भूमीवर उभ्या राहणाऱ्या कंपन्या-कारखान्यांमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रातील लोकांनाच रोजगार मिळाला पाहिजे. महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षापासून राहणारा मग तो देशातील कोणत्याही राज्यातून येथे स्थायिक झालेला असला तरी चालेल. पण रोजगारात त्यांनाच गुणवत्तेच्या बळावर प्राधान्य दिले पाहिजे. येथील कंपन्या व कारखाने हे स्थानिक भुमीपुत्रांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर उभे राहीले असल्याने सर्वप्रथम रोजगारात त्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्य पाहिजे. त्यानंतर प्राधान्यांने अल्पसंख्यांकांना गुणवत्तेच्या बळावर प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही म्हणत नाही की जाती धर्माच्या बळावर रोजगार द्या. कंपन्या व कारखाने प्रगतीपथावर गेले पाहिजेत, देशाची प्रगती झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु रोजगार निर्मितीमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्र व अल्पसंख्याकांचाही प्राधान्याने विचार झाला पाहिजे. आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने एमआयडीसीमधील कंपन्या व कारखान्यांना तसे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.