भाजपा जिल्हा चिटणिस गणेश भगत यांचे महापालिकेला साकडे
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये खुल्या गटासाठी पूर्वीप्रमाणे ६५ टक्के गुणांची मर्यादा ठेवणेबाबत तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी भाजपाचे नवी मुंबई जिल्हा चिटणिस गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर व महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून इयत्ता पहिलीपासून ते पदवीपर्यत तसेच अन्य समकक्ष अभ्यासक्रमासाठी गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसेच सभोवतालच्या महापालिकांमध्ये अशा प्रकारची शिष्यवृत्ती देणारी नवी मुंबई ही एकमेव महापालिका असावी. दोनच दिवसापूर्वी महापालिका प्रशासनाकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची माहिती देण्यात आली असून २८ फेब्रुवारीपर्यत हे अर्ज महापालिका प्रशासनास सादर करावयाचे आहेत. मात्र या शिष्यवृत्ती अर्जामध्ये पालिका प्रशासनाकडून बदल करण्यात आला असून तो बदल खुल्या गटासाठी मारक आहे. पूर्वी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना ६५ टक्के ही गुण मर्यांदा होती. ती ८० टक्के करण्यात आली आहे. यामुळे खुल्या गटातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती आहे. शिष्यवृत्तीमुळे अनेक गोरगरीब वर्गातील पालकांना आपल्या मुलांची शैक्षणिक फी भरण्यास मदत मिळत असे. या ८० टक्के मर्यांदेमुळे खुल्या गटातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील. ६५ टक्केवरून फार फार तर ७० टक्के निकष लावणे समजू शकते, पण थेट १५ टक्के वाढ करत ८० टक्क्यांवर नेण्यात आली आहे. प्रशासनाने नवी मुंबईकरांना विश्वासात न घेता हा एकतर्फी निर्णय घेतला आहे. सध्या प्रशासकीय राजवट आहे. लोकप्रतिनिधींचे सभागृह असते तर या निर्णयाला कडाडून विरोध झाला असता. त्यामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांवर या निकषामुळे होत असलेला अन्याय पाहता आपण तातडीने शिष्यवृत्तीच्या निकषात बदल करून खुल्या गटासाठी पूर्वीप्रमाणेच शिष्यवृत्तीसाठी ६५ टक्केची मर्यांदा खुल्या गटासाठी ठेवावी. यामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल. समस्येचे गांभीर्य व खुल्या गटातील विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय पाहता आपण शिष्यवृत्तीसाठी ८० टक्केची खुल्या गटासाठी ठेवलेली मर्यादा शिथील करून संबंधितांना तसे निर्देश द्यावेत आणि शिष्यवृत्ती अर्ज जमा करण्यासाठी देण्यात आलेली मुदत कमी असल्याने २८ फेब्रुवारीएवजी मुदत २० मार्च २०२४ पर्यत करण्याची मागणी गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.