अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘गाव चलो अभियानां’तर्गत नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सानपाडा गावातील अभियानाचा आज प्रवास सुरू केला. त्याला येथील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष नाईक यांनी विविध सामाजिक घटकांच्या आणि संस्थांच्या भेटीगाठी घेतल्या. ठीक ठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भाजपाचे बूथ अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अभियानादरम्यान त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासकरून महिला कार्यकर्त्या आणि युवकांची संख्या लक्षणीय होती.
गावदेवी मंदिरामध्ये दर्शन घेऊन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी गाव चलो अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानादरम्यान ठीक ठिकाणी दिवार लेखन करण्यात आले. श्री दत्त विद्यामंदिर शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.
यानंतर समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती डॉक्टर, वकील यांच्या भेटी घेतल्या. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, गुणवंत विद्यार्थी, स्थानिक प्रतिष्ठित, उद्योजक, व्यापारी, दुकान व्यवसायिक, सहकारी संस्था, फेरीवाले, भाजी विक्रेते अशा सर्व घटकांसोबत मनमोकळा संवाद साधला. सानपाडा गावातील जुन्या जाणत्या कुटुंबाच्या सदस्यांना देखील ते भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात झालेल्या दमदार विकास कामांची माहिती सांगणारी पत्रके या घटकांना दिली. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन या योजनांचे लाभार्थी होण्याचे आवाहन केले. जनसंघाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते, खेळाडू, शासकीय कर्मचारी यांच्या भेटी देखील घेतल्या. या भेटीदरम्यान ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. या अभियानाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील हाती घेण्यात आला होता. जिल्हाध्यक्ष नाईक यांनी अंगणवाडी क्रमांक १२ ला भेट दिली. तेथील अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पालक आणि अंगणवाडी सेविकांनी काही आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी केली असता महापालिका आयुक्तांबरोबर यासंदर्भात लवकरात लवकर बोलून सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष नाईक यांनी त्यांना दिली.
गायत्री परिवार केंद्रामध्ये पार पडलेल्या बचत गटांच्या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष नाईक यांनी मार्गदर्शन केले. मातृशक्ती सोबत संवाद साधला. त्यांच्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या. अर्चना वानखडे, सिंधू रोकडे, संगीता या सदस्यांनी महिलांना घरच्या घरी रोजगार मिळेल, यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यावर उद्योजकांकडे असलेल्या रोजगारांच्या संधींची माहिती बचत गटांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्द जिल्हाध्यक्ष नाईक यांनी दिला. रोजगार प्राप्तीसाठी आवश्यक प्रशिक्षण महिला भगिनींनी घ्यावे, असा सल्ला देत लवकरच बचत गटातील महिलांसाठी मेळावा आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
बूथ कमिटीच्या बैठकीमध्ये बूथ स्तरावर करावयाच्या कामांची माहिती उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. गाव चलो अभियानाबद्दल प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीपणे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. देशातील सर्व घटकांचे कल्याण साधले गेले आहे. जगामध्ये भारताचा मानसन्मान वाढला आहे. विकसित राष्ट्र म्हणून भारताची वाटचाल सुरू आहे. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू असे वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प साकारले जात आहेत. नवी मुंबई हे देशातील आर्थिक विकासाचे केंद्र होईल, असे भाकीत खुद्द पंतप्रधान मोदी यांनी वर्तवले आहे. नवी मुंबईबद्दल सांगताना जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, येथील जमिनी एमआयडीसी आणि सिडकोणे संपादित केल्या. ग्रामपंचायतमधून थेट महापालिकेमध्ये नवी मुंबई वर्ग झाली. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या लोककल्याणकारी आणि दूरदर्शी विकासाभिमुख धोरणांमुळे प्रगत शहर म्हणून नवी मुंबईचा लौकिक वाढला आहे. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता सर्वच उत्तम दर्जाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. सार्वजनिक स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रात सातत्याने पहिला क्रमांक आणि देशात पहिल्या पाच क्रमांकामध्ये नवी मुंबईचा क्रमांक लागतो, असे नमूद केले. सानपाडा येथील गाव चलो अभियानामध्ये जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या समवेत वैभव वास्कर, भाऊ भापकर, भालचंद्र पाटील, दत्ता पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, जगदीश पाटील, शैला पाटील, राजेश ठाकूर, शिल्पा ठाकूर, साईनाथ मढवी, रवींद्र पाटील, दीपिका बामणे, मंदाकिनी कुंजीर, राजू सय्यद, अशोक कवडे, गणेश कमळे, रूपाली कदम, पवार मॅडम, भरत डोकले आदी मान्यवर उपस्थित होते.