माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घ आजाराने निधन
जयेश रामचंद्र खांडगेपाटील याजकडून
जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदार संघातून सलग सहावेळा (१९८५ ते २००९) निवडणूक लढवून त्यातील चार वेळा विजय प्राप्त करणारे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे निष्ठावान, विश्वासू शिलेदार असलेले माजी आमदार वल्लभशेठ दत्तात्रय बेनके (वय ७४) यांचे उपचार सुरु असताना दीर्घ आजाराने आज रात्री निधन झाले.
सोमवारी (ता.१२) सायंकाळी चार वाजता हिवरे बुद्रुक(ता. जुन्नर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, पूत्र आमदार अतुल, डॉ.अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी,सुना,नातवंडे असा परिवार आहे. बेनके यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
आमदार अतुल बेनके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची २०१४ साली उमेदवारी मिळाली होती. या विधानसभा निवडणूकी दरम्यानच त्यांच्या प्रकृती बिघडली होती. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली नाही.सन २०१४ पासून राजकारणा पासून ते अलिप्त होते. मात्र त्यांचा जनाधार कधीही कमी झाला नाही. त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले.मागील दहा वर्ष त्यांच्यावर त्यांचे पुत्र डॉ. अमोल, हृदयरोग तज्ञ डॉ.सदानंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. दीर्घ आजारामुळे त्यांचे अवयवही निकामी होत गेले. त्यांची पत्नी, मुले,सुना यांनी मागील दहा वर्षे त्यांची सुश्रुषा केली.आज अखेर रात्री चाकण येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वल्लभ बेनके यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. जुन्नर तालुक्यात वल्लभ बेनके यांचा मोठा जनाधार असून तालुक्यावर सुतकी अवकळा पसरल्याचे पहावयास मिळत आहे.
दिलीप वळसे पाटील( सहकार मंत्री): माझा जीवाभावाचा सहकारी हरपला. चार वेळा ते विधानसभा सदस्य होते.सामाजिक, शैक्षणिक आरोग्य, कृषी,सांस्कृतिक, सिंचन क्षेत्रामध्ये त्यांचे फार मोठे काम आहे. शिवनेरी परिसर विकासासाठी सतत विधिमंडळात व शासनाकडे त्यांचा पाठपुरावा होता. जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा वारसा समर्थपणे त्यांचे चिरंजीव आमदार अतुल बेनके, डॉ. अमोल,अमित बेंनके हे समर्थपणे चालवतील.