पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह , अमृत योजने अंतर्गत मलनिस्सारण व मल प्रक्रिया केंद्र, जलकुंभ व रस्त्यांचे होणार भूमीपूजन
राजेंद्र पाटील : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजता राज्याचे उद्योग मंत्री व रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कळंबोली येथे होणार असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे असणार आहेत.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या कळंबोली मधील सेक्टर ११ येथील प्लॉट क्रमांक ६/१ येथे होणाऱ्या या समारंभास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या समारंभात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधकाम’, ‘खारघर नोड मधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनर्पृष्ठीकरण’, ‘कळंबोली नोड मधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनर्पृष्ठीकरण’, ‘महानगरपालिका मुख्यालय लगतच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण व उन्नतीकरण’, ‘पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गाचे काँक्रीटीकरण’, तसेच ‘अमृत योजनेंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या व मल प्रक्रिया केंद्र उभारणे आणि पाणी पुरवठा वितरण व्यवस्था उभारणे’ अशा ६५० कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.