नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीकरता शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबई जिल्हा माजी उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून इयत्ता पहिलीपासून ते पदवीपर्यत तसेच अन्य समकक्ष अभ्यासक्रमासाठी गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसेच सभोवतालच्या महापालिकांमध्ये अशा प्रकारची शिष्यवृत्ती देणारी नवी मुंबई ही एकमेव महापालिका असावी. दोनच दिवसापूर्वी महापालिका प्रशासनाकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची माहिती देण्यात आली असून २८ फेब्रुवारीपर्यत हे अर्ज महापालिका प्रशासनास सादर करावयाचे आहेत. मुळातच पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली मुदत कमी असून अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. उत्पन्नाचे दाखल काढणे व अन्य कागदपत्रांची जमवाजमव करण्यास, ऑनलाईन अर्ज भरण्यास विलंब होतो. अनेकदा ऑनलाईन अर्ज भरावयास गेल्यावर सर्व्हर डाऊन असतो. पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. 28 फेब्रुवारी ही दिलेली मुदत कमी कालावधीची असून यामुळे गरीब व पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य जाणून घेता आपण शिष्यवृत्ती अर्ज जमा करण्यासाठी देण्यात आलेली मुदत कमी असल्याने 28 फेब्रुवारीएवजी मुदत २० मार्च २०२४ पर्यत करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबई जिल्हा माजी उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.