जयेश रामचंद्र खांडगे याजकडून
आर्वी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये आमचा आनंदी बाजार भरविण्यात आला. या आनंदी बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय करण्याची क्षमता, आर्थिक देवाण-घेवाण कशाप्रकारे होते व त्यातून आपल्याला पैसा कशाप्रकारे प्राप्त होतो, व्यवहार ज्ञान कसे मिळावे तसेच विकत असलेल्या वस्तूंचे ग्राहकांना महत्त्व कसे पटवायचे या उद्देशाने व प्रत्यक्ष बाजार अनुभूतीसाठी बाल आनंद मेळावा भरवण्यात आला होता.
या मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी लावलेल्या विविध ५४ स्टॉल मधून सुमारे पंधरा हजार रुपयांची उलाढाल झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बटाटा, कांदे, मेथीची भाजी, कोथिंबीर, भोपळा, शेपू, वांगी, मटकी, कांदापात, पावटा, शेवगा, सफरचंद, द्राक्ष, केळी अशी विविध प्रकारचा भाजीपाला आणि फळे विक्रिसाठी आणला होता. तर खाऊ गल्लीत भेळ, लाडू, पाणीपुरी, इडली अप्पे, मंचुरियन, वडापाव, समोसा पाव, ढोकळा, बिस्किट असे विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारा विद्यार्थी हा संपूर्ण ग्रामीण भागातील असून बहुतांश मुले ही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आनंदी बाजार आयोजित करण्यात आला होता.
गावातील महिलांनी, ग्रामस्थांनी आवर्जून शाळेत येऊन विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केला. शाळेमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या बाजाराचे नियंत्रण केले.
या आमचा आनंदी बाजाराचे उद्धाघाटन ग्रामपंचायत आर्वीच्या विद्यमान सदस्या स्वाती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत आर्वीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, आधार जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा जयवंताबाई मुळे व त्यांचे सर्व सदस्य, त्याचबरोबर शिवनेरी विद्यालय आर्वीचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच विद्यार्थ्यांचे पालक व समस्त ग्रामस्थ आर्वी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यापुढेही विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास होण्यासाठी शाळेत अशा प्रकारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे मान्यवरांनी सुचित केले. सदर उपक्रमाचे आयोजन व नियोजन मुख्याध्यापक संतोष शिंदे, उपशिक्षक संदीप थोरात, चैताली सरोदे, प्रशांत ढवळे यांनी केले.
आजच्या काळात इंग्लिश मीडियम मराठी मिडीयम खाजगी शाळेमध्ये घालण्याचा लोकांचा कल आहे. पण या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत ९५ विद्यार्थी आहेत याचे सर्व श्रेय सर्व शिक्षकांना दिले जात असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.