स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेशी महिला वर्गाला जोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नऊ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन अभियानाचा बुधवारी देशभर समारोप करण्यात आला. पश्चिम बंगाल येथील बारासात मधून पंतप्रधान मोदी यांनी देशातील करोडो बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि महिला वर्गाशी ऑनलाइन संवाद साधून देशातील नारीशक्तीचा विकास राष्ट्रशक्ती म्हणून भाजपा करीत असल्याचे सांगितले. नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने दिलेल्या सूचनेनुसार नवी मुंबईमध्ये ११ मंडळ स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या संबोधनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
दिघा मंडळ, ऐरोली मंडळ, घनसोली मंडळ, कोपरखैरणे मंडळ, वाशी मंडळ, तुर्भे मंडळ, सानपाडा मंडळ, नेरूळ पूर्व मंडळ, नेरूळ पश्चिम मंडळ, सीवूड-करावे मंडळ, बेलापूर मंडळ अशा प्रत्येक मंडळ स्तरावर महिला भगिनींची भरगच्च उपस्थिती लाभली. ऐरोली मंडळ येथे लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी, वाशी मंडळ येथे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी, सीवूड-करावे मंडळ येथे नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि दिघा मंडळ येथे माजी महापौर सागर नाईक यांनी शक्ती वंदन कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थिती दर्शवली.
पंतप्रधानांकडून महिला समानता आणि सक्षमीकरणाचे ऐतिहासिक कार्य- लोकनेते आ. गणेश नाईक
शक्ती वंदन समारोप कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मागील दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महिला समानता आणि सक्षमीकरणाचे ऐतिहासिक काम झाल्याचे सांगितले. यापूर्वी कधीही दिले गेले नाही असे 33% राजकीय आरक्षण देण्यात आले. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद केली. उज्वला योजना, पंतप्रधान निवास योजना, मुद्रा योजना, शेतकरी सन्मान योजना, लखपती दीदी योजना अशा अनेक योजनांमधून महिलांचे सक्षमीकरण झालेले आहे. देशातील माता-भगिनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपासाठी ‘अबकी बार चारसो पार’चा नारा नक्कीच प्रत्यक्षात उतरवतील, असा विश्वास लोकनेते आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
मातृशक्ती नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल – डॉक्टर संजीव नाईक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मातृशक्तीला ताकद दिली आणि आत्मनिर्भर केले. देशातील नारीशक्ती पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी ताकद देईल, असा विश्वास डॉक्टर संजीव नाईक यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या परिवारा बाबत अपमानास्पद भाष्य करणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येते असं सांगून देशातील १४० करोड जनतेला पंतप्रधान आपला परिवार मानतात, असे नमूद केले.
नारीशक्ती वंदन अभियानामध्ये नवी मुंबईत अभूतपूर्व प्रतिसाद- जिल्हाध्यक्ष संदीप नाईक
नारीशक्ती वंदन अभियानामध्ये नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन,पदयात्रा, स्कुटी रॅली अशा कार्यक्रमांमधून हजारो महिला भगिनींनी सहभाग नोंदवला. एक अभूतपूर्व असा उत्साह पहावयास मिळाला, असे प्रतिपादन नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, लोकनेते आमदार गणेश नाईक सर्वांचे मार्गदर्शन मिळाले. नवी मुंबईतील भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हे अभियान यशस्वी केले. देशामध्ये मागील ७५ वर्षात जेवढे महिला सक्षमीकरणाचे काम झाले नाही तेवढे काम पंतप्रधान मोदी यांच्या मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात झाल्याचे त्यांनी सांगितले. देशहित सर्वप्रथम अशी विचारधारा जपणाऱ्या भाजपाचे यश हेच भारताचे यश असल्याचे मत जिल्हाध्यक्ष नाईक यांनी मांडून विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी देशातील मातृशक्तीचा पाठिंबा पंतप्रधान मोदी यांच्या मागे असल्याचे ते म्हणाले. ‘अबकी बार चारसो पार’ची घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये नवी मुंबई भाजपा जिल्ह्याचा सहभाग असेल असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांचे लोककल्याणकारी कार्य आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जोमाने नवी मुंबई भाजपा जिल्हा कार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देश विकासाच्या विचारधारेने प्रेरित होऊन आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या सर्वांचे भाजपात स्वागत केले. या सर्वांचे आम्ही भाजपा परिवारामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला नवी मुंबईत आणखी बळकटी प्राप्त होईल, असा विश्वास डॉक्टर संजीव नाईक यांनी व्यक्त केला.
पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि कर्तबगार महिलांचा सन्मान
नारीशक्ती वंदन समारोप कार्यक्रम प्रसंगी मंडळ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या महिला भगिनींचा देखील देखील करण्यात आली. याशिवाय विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणाऱ्या महिला भगिनींचा देखील सन्मान करण्यात आला.
मी आहे मोदीजींचा परिवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिवार नाही अशी टीका करणाऱ्यांना देशातील करोडो नागरिकांनी जोरदार चपराक दिली असून देशातील 140 करोड जनताच आपला परिवार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. “मी आहे मोदीजींचा परिवार” हे घोषवाक्य हाती घेऊन शक्ती वंदन समारोपप्रसंगी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पंतप्रधानांना समर्थन दिले.