नवी मुंबई : संतोष शेट्टी हे कॉंग्रेसचे निष्ठावंत असून गेली अनेक वर्षे ते कॉंग्रेस पक्षसंघटनेचे ठाणे जिल्हा पातळीवर नेतृत्व करत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून सलग चार वेळा ते कॉंग्रेसच्या वतीने नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सौ. अनिता संतोष शेट्टी यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी संतोष शेट्टी हे आजही कॉंग्रेस पक्षातच आहेत. ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरी आराम करत आहेत. भाजपाने स्वत:चा पक्ष वाढविताना अनेल पक्ष फोडण्याचे काम आजवर केले आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रात पितापुत्रांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला. पण भाजपा इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण करू लागली आहे की त्यांनी आता पती-पत्नीमध्येही राजकीय फूट पाडण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा घणाघाती आरोप नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी केला आहे.
नेरूळ पूर्वेला संतोष शेट्टी यांच्यामुळे कॉंग्रेस पक्षाची पाळेमुळे विस्तारली आहे. आमच्यासारख्या असंख्य युवकांना मार्गदर्शन करताना संतोष शेट्टी यांनी घडविले आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात नावारुपाला आणले आहे. कॉंग्रेस पक्षातून ते स्वत: सलग चार वेळा तर त्यांच्या पत्नी सौ. अनिता शेट्टी या एकदा कॉंग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. संतोष शेट्टी यांनी स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेतेपदावरून महापालिका सभागृहात कॉंग्रेसचे अस्तित्व प्रभावीपणे दाखवून दिलेले आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीमध्येही ते अनेक वर्षे पदाधिकारी होते. संतोष शेट्टी म्हणजेच कॉंग्रेस असे नेरूळ पूर्वेकडील वातावरण आहे. परंतु आता त्यांच्या पत्नीलाच भाजपात घेवून भाजपाने पती-पत्नीमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप रविंद्र सावंत यांनी केला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेश पातळीवरील पदाधिकारी संतोष शेट्टी यांची कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी भेट घेतली असता, संतोष शेट्टॅी यांनी आपण आजही कॉंग्रेसमध्ये असल्याचे सांगताना कॉंग्रेस सोडून आपण अन्य पक्षाचा विचारही करु शकत नसल्याचे सांगितले, भाजपा घराघरामध्ये फूट पाडत असल्याचे नवी मुंबईकरांनी २०१४च्या विधानसभा निवडणूकीतही पाहिले असल्याचे रविंद्र सावंत यांनी यावेळी सांगितले.