स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
पुणे : उन्हाळी पार्श्वभूमीवर पाणीटंचाई पाहता शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत न करता देयक भरण्यासाठी त्यांना मुदतवाढ देणे तसेच जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी लेखी मागणी जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते जयेश खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. मे महिना आता सुरु होईल. उन्हाच्या उकाड्याने सर्व त्रस्त झाले आहेत. झाडाची पानेही हलत नाही, अंगावर घामाच्या थारा वाहत आहेत. दोन-तीन वर्षात बिबट्याच्या दहशतीने शेतीचे तीनतेरा होऊ लागले आहेत. उसाशेजारील शेतात काम करायला मजुर तर सोडा, पण शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्यांना जाण्यास भीती वाटते. बिबट्यांना लपण्यास अनेक जागा असल्याने शेती आता पूर्वीसारखी होत नाही. तसेच शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. बाजारभाव भेटत नसल्याने मजुरीचा तसेच लागवडीचाही खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांना अनेकदा उभ्या पिकामध्ये जनावरे घुसवावी लागली आहेत. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना घरचा खर्च भागविताना नाकीनऊ आले असल्याचे जयेश खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्या पाण्याची पातळी खालावाल्याने पाण्याची मोटरही गुळणी टाकत आहे. घरातील सदस्यांना तसेच दुभत्या जनावरांइतकेच काही भागात पाणी उपलब्ध होत आहे. पिकांमध्ये पैसे न भेटल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. शेतकऱ्यांना कृषीपंपाचे वीजदेयकही भरणे शक्य झालेले नाही. त्यातच ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज विभागाकडून वीज देयक न भरल्याने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे काम सुरु झाले आहे. एकतर पाण्याची पातळी खालावल्याने शेतकऱ्यांच्या परिवाराला व जनावरांना जेमतेम पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे. त्यात कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत झाल्यास घरातील माणसांना व गोठ्यातील जनावरांना जगविण्यासाठी शेतकऱ्याला वणवण फिरावे लागेल. जगाचा अन्नदाता व पोशिंदा असलेल्या बळीराजावर अशी वेळ येणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नाही. आपण समस्येचे गांभीर्य पाहता वीज विभागाला जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत न करण्याचे आदेश द्यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला असेल तो तातडीने पुन्हा जोडून देण्याचेही आदेश द्यावेत. शेतकऱ्यांना कृषीपंपाचे देयक भरण्यासाठी त्यांना काही मुदत द्यावी तसेच दर महिन्याला थोडे थोडे हफ्ते भरण्याचे सूचित करावे. समस्या गंभीर होत चालली आहे. कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत झाल्याने शेतकरी परिवाराला स्वत:च्या घरासाठी व गोठ्यातील जनावरांसाठी पाण्याची भीक मागण्याची वेळ आली आहे. आपण स्वत: शेतकरी आहात. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून आहात. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जयेश खांडगेपाटील यांनी केली आहे.