Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कुकशेत व नेरूळ सेक्टर सहामधील अंर्तगत रस्त्यावरील बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका नेरूळ विभाग कार्यालयातंर्गत असलेल्या कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर सहाच्या मध्यभागी एक वर्दळीचा रस्ता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुकशेत गावाच्या बाजूने असलेले या रस्त्यावरील पथदिवे बंदच आहेत. आता पावसालाही सुरुवात झालेली आहे. पथदिवे बंद असल्याने रात्री ७ नंतर ते सकाळी ६ वाजेपर्यत या मार्गावर अंधारच असतो. हे पथदिवे सुरु करण्यासाठी स्थानिक भागातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही सातत्याने आयुक्त कार्यालयाकडे व पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे. तथापि निवेदने फॉरवर्ड करण्याशिवाय आयुक्त कार्यालयाकडून आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. रात्रीच्या अंधारात या ठिकाणी अपघात होण्याची भीती आहे. पाऊस सुरु झाल्यावर समोरचे काही दिसत नाही. अशावेळी या ठिकाणाहून वाहनांची ये-जा करताना होणाऱ्या वर्दळीत अपघात होण्याची, जिवितहानी होण्याचीही भीती आहे. दहा-पंधरा दिवस नाही तर अनेक दिवसांपासून हे रस्त्यालगतचे सर्वच पथदिवे बंद आहेत. ते कधी सुरु होणार, याचे कोणतेही उत्तर पालिका प्रशासनाकडून देण्यात येत नाही. नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी व कुकशेत गावचे ग्रामस्थ तसेच येथून ये-जा करणारे नेरूळमधील वाहनचालक महापालिकेचा कर भरत नाही काय? मग कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर सहामधील अंर्तगत रस्त्यावरील पथदिवे महिन्याहून अधिक कालावधी लोटला तरी बंदच आहेत. आपण रात्रीच्या वेळी या भागातून गेल्यास आपणास समस्येचे गांभीर्य पाहता येईल. आपण समस्येचे गांभीर्य पाहता या मार्गावरील बंद पडलेले पथदिवे तात्काळ सुरु करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.