भाजपाच्या माजी नगरसेविका सौ. रुपाली भगत यांची मागणी
नवी मुंबई : नेरूळ नोड येथील प्रभाग ९६ मधील पावसाळीपूर्व कामांची माहिती मागवून घेण्याची व प्रभाग ९६ मध्ये पाहणी अभियान राबविण्याची लेखी मागणी भाजपाच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
आता नुकतीच कुठे पावसाला सुरुवात झालेली आहे. नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात पावसाळी पूर्व कामांचा एक भाग म्हणून कोठे कोठे वृक्षछाटणी झाली आहे. कोठे रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. कोठे पदपथाची दुरुस्ती केलेली आहे. कोठे कोठे गटारांची तळापासून सफाई केली आहे. रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्यांच्या चेम्बर्सची झाकणे बदलली आहेत, कोठे पथदिव्यांची कामे केली आहेत, याचा संबंधितांकडून लेखी अहवाल तारीखवार मागवून घ्यावा. पावसाळा कालावधीत येथे नेहमीच झाडांची व फांद्यांची पडझड होत असते. पथदिव्याची समस्या निर्माण होत असते. पावसाळापूर्व कामे काळजीपूर्वक झाली नसल्यास व पावसाळा कालावधीत काही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असा इशारा माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
महापालिका आयुक्त म्हणून नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ या परिसरात पाहणी अभियान राबवावे व स्थानिक नागरिकांशी चर्चा करावी. या चर्चेतून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या व असुविधा याची आपणास थेट कल्पना येईल. आम्ही अनेकदा लेखी पाठपुरावा करुन थकतो, परंतु महापालिका प्रशासनाकडून येथील रहीवाशांची कामे होत नाहीत. येथील नागरिक पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरुन महापालिका प्रशासनास सहकार्य करत असतानाही प्रभागातील कामे होत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पाहणी अभियान राबवून थेट नागरिकांशी सुसंवाद साधण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.