नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : पावसाळ्यामध्ये दरवर्षी होत असलेल्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर जुईनगर नोड व नेरूळ सेक्टर दोन व चारमधील रहीवाशांसाठी आरोग्य विभागाचे मार्गदर्शन शिबीर तातडीने आयोजित करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
आता नुकतीच कुठे पावसाला थोडीशी सुरुवात झाली असून लवकरच मुसळधार पाऊस सुरु होण्याची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांचा नेरूळ आणि जुईनगर परिसरामध्ये उद्रेक होत असतो. महापालिका रुग्णालयामध्ये तसेच नागरी आरोग्य केंद्रामध्ये या कालावधीत साथीच्याच आजाराचे रुग्ण पहावयास मिळतात. नवी मुंबई शहराची निर्मिती ही खाडीअंर्तगत भागात तसेच खाडीलगतच्या परिसरात झालेली असल्याने नेरूळ सेक्टर दोन व चारमधील तसेच जुईनगर नोडमधील बाराही महिने ३६५ दिवस डासांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या डासांमुळेच साथीच्या आजारांना खतपाणी मिळत असते. साथीच्या आजारांचा उद्रेक झाल्यावर उपाययोजना करण्याऐवजी साथीचे आजार होऊ नये यासाठी जुईनगर व नेरूळमधील नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यामुळे नेरूळ सेक्टर दोन-चार तसेच जुईनगर नोडमधील रहिवाशांसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून येथील प्रत्येक प्रभागामध्ये मार्गदर्शन अभियान व्यापक प्रमाणावर राबविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.