नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील कामाबाबत राज्य सरकारने जनतेला जाहीरपणे माहिती देण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हा गेली अनेक वर्षे प्रलंबित विषय आहे. सरकार या मार्गाच्या कामास गेली अनेक वर्षे विलंब करुन कोकणवासियांच्या संयम व सहनशीलतेची परिक्षा पाहत आहे. वर्ष २०११ ला पूर्ण होणारा प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. आता मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी नवीन डेडलाईन सरकारने न्यायालयात दिली आहे. आता, ३१ डिसेंबर २०२४ ही नवीन डेडलाईन सरकारने ठरवली आहे. हा पावसाळा सुरु आहे. अवघे सहा महिने आता उरले आहेत. काम बरेच बाकी आहे. त्यामुळे या मुदतीतही काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. सर्वांचीच सरकारे आली आणि गेली, पण हे काम ना पूर्ण झाले. ना कामास गती मिळाली. प्रकल्पाला होत असलेल्या विलंबामुळे उच्च न्यायालयाने वारंवार नाराजी व्यक्त करुनही राज्य सरकारकडून आजतागायत कामाला पाहिजे तशी गती देण्यात आलेली नाही. तसेच प्रकल्प लांबणीवर पडल्याने खर्चातही वाढ होत असून जनतेच्या पैशाचा हा अपव्यय आहे. दरवर्षी कोकणवासियांना गावी जाण्यायेण्यासाठी गणेशोत्सवाला व उन्हाळी-दिवाळी सुट्टीमध्ये खड्ड्यांतूनच ये-जा करावी लागत आहे. दहा वर्षामध्ये या मार्गावर दोन हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला असल्याची कबुली राज्य सरकारनेच विधीमंडळात दिलेली आहे. मुंबई-गोवा चौपदरीकरणास होत असलेल्या विलंबाचा त्रास कोकणवासियांनाच अधिक सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता कोकणवासियांच्या संयमाचा अंत पाहू नये. याप्रकरणी कामाची सध्या स्थिती काय आहे? किती दिवसात पूर्ण होईल? इतकी वर्षे या कामास विलंब का झाला? याबाबत राज्य सरकारने कोकणच्या जनतेला जाहीरपणे स्पष्टीकरण देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.