नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ मधील महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानातील तुटलेल्या खेळण्याची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर दोनमध्ये महापालिकेचे सार्वजनिक उद्यान आहे. या उद्यानात खेळणी आजमितीला तुटलेली असल्याने मुलांना खेळण्याचा वापर करता येत नाही. उद्यानातील खेळणी बाराही महिने तुटलेल्या अवस्थेत असतात. तक्रारी केल्यावर तात्पुरती स्वरुपात डागडूजी केली जाते व पुन्हा दहा-बारा दिवसात खेळणी तुटतात. असाच प्रकार गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. आजही उद्यानातील खेळणी तुटलेली आहेत. उद्यानात जंगली गवतही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पाऊस सुरु झाल्यावर हे गवत आणखी वाढेल. बाजूला मोठा नाला व रेल्वे पटरी असून येथून नाग-साप नेहमीच उद्यानात येत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता उद्यानातील खेळणी दुरुस्त करण्याचे व उद्यानात वाढलेले जंगली गवत काढून टाकण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.