नवी मुंबई : पावसाळा कालावधीत साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांसाठी मार्गदर्शन अभियान राबविण्याची मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
आता नुकतीच कुठे पावसाला थोडीशी सुरुवात झाली असून लवकरच मुसळधार पाऊस सुरु होण्याची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या आजारांचा उद्रेक होत असतो. महापालिका रुग्णालयामध्ये या कालावधीत साथीच्याच आजाराचे रुग्ण पहावयास मिळतात. नवी मुंबई शहराची निर्मिती ही खाडीअंर्तगत भागात तसेच खाडीलगतच्या परिसरात झालेली असल्याने नवी मुंबईकरांना बाराही महिने ३६५ दिवस डासांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या डासांमुळेच साथीच्या आजारांना खतपाणी मिळत असते. साथीच्या आजारांचा उद्रेक झाल्यावर उपाययोजना करण्याऐवजी साथीचे आजार होऊ नये यासाठी नवी मुंबईकरांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण दिघा ते बेलापुरदरम्यान असलेल्या नवी मुंबई शहरामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये मार्गदर्शन अभियान व्यापक प्रमाणावर राबविण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.