भाजपा नेते पांडुरंग आमले यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही मलेरिया, डेंग्यू या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढू लागल्याने सानपाडा, जुईनगर विभागात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याची मागणी भाजयुमोचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी गेल्या २० ते २२ दिवसांमध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. नवी मुंबई शहर हे खाडीकिनारी तसेच खाडीअंर्तगत भागात वसविले गेले असल्याने या शहरातील लोकांना बाराही महिने डासांच्या उद्रेकाचा पर्यायाने मलेरियाचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींच्या आजारांची मोठ्या प्रमाणात शहरवासियांना लागण होते. गेल्या काही दिवसांपासून सानपाडा, जुईनगर नोडमध्ये डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहे. उपचारासाठी लोक खासगी दवाखाने व रुग्णालयात जात असल्याने या आजारांच्या तीव्रतेचा महापालिका प्रशासनाला अंदाज येत नाही व ठोस आकडेवारीही प्राप्त होत नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचे गांभीर्य पाहता आपण सानपाडा व शिरवणे नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी घरोघरी पाठवून लोकांना साथीच्या आजारांवरिल उपचाराबाबत व आजार न होण्याबाबत घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे तसेच सानपाडा व जुईनगर परिसरात महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने सानपाडा नोड, सानपाडा पामबीच परिसर, सानपाडा गाव, जुईनगर या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.