नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन-चार व जुईनगर नोडमध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याविषयीच्या कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्याताई भांडेकर यांच्या लेखी पाठपुराव्याची दखल महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आली असून पामबीच मार्गालगतच्या नेरूळ सेक्टर दोनमधील वाधवा टॉवर ते सारसोळे स्मशानभूमीपर्यतच्या पदपथावर महापालिका प्रशासनाकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली आहे.
पाऊस सुरु झाल्यामुळे नेरूळ सेक्टर दोन व चारमधील तसेच जुईनगर नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतचे पदपथ निसरडे झाले असल्याने त्यावरून ज्येष्ठ नागरिक. महिला, मुले घसरुन पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचे गांभीर्य ओळखून या परिसरातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली होती. समस्येचे गांभीर्य व भांडेकर यांच्या निवेदनातील कळकळ लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यास सुरु केली आहे. विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांचे व महापालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून नेरूळ सेक्टर दोन व जुईनगर नोडमध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी पालिकेच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे भांडेकर यांनी यावेळी सांगितले.