भाजपाच्या माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांची मागणी
नवी मुंबई : पावसाळ्यातील वाढत्या साथीच्या आजारांवर नियत्रंण मिळविण्यासाठी नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्याची लेखी मागणी प्रभाग ९६ च्या माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ अ, १८ या परिसराचा समावेश होत आहे. हा परिसर पामबीच मार्गालगत म्हणजेच खाडीपासून हाकेच्या अंतरावरच आहे. पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी गेल्या २० ते २२ दिवसांमध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. नवी मुंबई शहर हे खाडीकिनारी तसेच खाडीअंर्तगत भागात वसविले गेले असल्याने या शहरातील लोकांना बाराही महिने डासांच्या उद्रेकाचा पर्यायाने मलेरियाचा सामना करावा लागत आहे. प्रभाग ९६ हा परिसर खाडीलगतच आहे. दरवर्षी पावसाळ्यात ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आदी साथींच्या आजारांची मोठ्या प्रमाणात प्रभाग ९६ मधील रहीवाशांना लागण होते. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग ९६ मध्ये डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढीस लागले आहे. उपचारासाठी लोक खासगी दवाखाने व रुग्णालयात जात असल्याने या आजारांच्या तीव्रतेचा महापालिका प्रशासनाला अंदाज येत नाही व ठोस आकडेवारीही प्राप्त होत नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचे गांभीर्य पाहता नेरूळ गाव व कुकशेत गाव नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी प्रभाग ९६ मधील घरोघरी पाठवून लोकांना साथीच्या आजारांवरिल उपचाराबाबत व आजार न होण्याबाबत घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे तसेच प्रभाग ९६ मधील परिसरात महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने नेरूळ सेक्टर १६, १६ अ, १८ या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी सौ. रुपाली किस्मत भगत यांनी केली आहे.