महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे महापालिका आयुक्तांना साकडे
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : ठोक मानधनावरील शिक्षक अजित होनवार सर यांना महापालिका प्रशासनाने आर्थिक मदत तसेच त्यांच्यावरील उपचाराची सर्व जबाबदारी स्विकारण्याची लेखी मागणी कामगार नेते व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तकैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र कर्मचारी युनियन महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनाच्या स्वरुपात तसेच शिष्टमंडळाच्या माध्यमातून त्या त्या वेळच्या महापालिका आयुक्तांच्या भेटी घेऊन ठोक मानधनावर काम करणारे शिक्षक व तसेच इतर विभागातील ठोक मानधनावरील कर्मचारी, परिवहन विभागात कार्यरत असणारे ठोक मानधनावरील कर्मचारी या सर्वांना सध्याच्या महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनात करावे लागणारे काम पाहता महापालिका प्रशासनाने या सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, त्यांचा प्रशासनाने मेडीक्लेम काढावा यासाठी पाठपुरावा करत आहोत. आंदोलने केली, निदर्शने केली. पण महापालिका प्रशासनाला या समस्येचे गांभीर्य निदर्शनास येऊ नये, समजू आणि उमजू नये ही या नवी मुंबई शहराची खरोखरीच शोकांतिका आहे. परिवहन विभागात ठोक मानधनावर काम करणारे चालक व वाहक यांना अवघ्या अठरा ते वीस हजार रुपये वेतनामध्ये आपले कुटूंब चालवावे लागत आहे. या अत्यल्प वेतनातही ते प्रामाणिकपणे नवी मुंबईकरांना सेवा देत आहे. त्यांना मेडिक्लेम नाही, आरोग्य सुविधा नाही, अशा परिस्थितीत हे ठोक मानधनावरील कर्मचारी काम करत आहे. आजारी पडल्यास त्यांना कर्ज काढावे लागते व आयुष्यभर ते कर्ज त्यांना फेडावे लागते. महापालिका प्रशासन का त्यांच्या जीवाशी खेळत आहे तेच समजत नसल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका शिक्षण विभागातील माध्यमिक विभागात श्री. अजित होनवार सर हे गेल्या 12 ते 13 वर्षापासून कार्यरत असून नुकताच त्यांच्या घरात सकाळी साडेसहाच्या दरम्यान गॅस गळतीमुळे स्फोट झाला आहे. यात सर्व कुटुंब जळाले असून नॅशनल बर्न हॉस्पिटल (खाजगी) ऐरोली येथील आयसीयूमध्ये ते सर्वजण सध्या उपचार घेत आहेत. होनवार सरांच्या 20 वर्षीय मुलाची परिस्थिती अतिशय चिंताजनक असून स्वत : होनवार सरांची व त्यांच्या पत्नीचीही परिस्थिती गंभीर आहे. त्यांच्या घरी आर्थिक अडचण असून घरची परिस्थितीही अंत्यत हलाखीची आहे. महापालिका प्रशासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या उपचाराची जबाबदारी महापालिका प्रशासनाने स्विकाराण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.