आमदार मंदाताई म्हात्रे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : अक्षता म्हात्रे प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याबाबतचे गृहविभागाकडून लेखी आदेश त्वरित पारित करण्याची लेखी मागणी बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ जुलै रोजी दिल्लीतून अक्षता म्हात्रे अत्याचार व हत्या प्रकरणातील खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकमसाहेब यांची नेमणूक करण्यात यावी व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याबाबतचे आदेश ठाणे, नवी मुंबई आयुक्त आणि प्रधान सचिव गृह विभाग यांना दिले होते, परंतु मधल्या काळात विशेष सरकारी वकिलांची अधिकृत नियुक्ती केल्याचे लेखी आदेश विशेष सरकारी वकील यांना प्राप्त झाले आहेत की नाहीत ? व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार की नाही ? याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे अक्षताच्या माहेरचे आगास्कर कुटुंबिय व समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याची दखल घेऊन त्याबाबतीत लवकरात लवकर कारवाई करून विशेष सरकारी वकिलांची नेमणूक व सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे अधिकृत लेखी आदेश गृहविभागाने त्वरीत पारित करावे अशा मागणीचे निवेदन बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई करण्याची विनंती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केली असता या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे यांच्या मागणीची त्वरित दखल घेऊन या मागणीची पूर्तता करून तात्काळ कारवाई करण्याबाबत आमदारांच्या त्या पत्रावर शेरा मारून ते पत्र संबंधित विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठवले. तसेच पोलीस तपासात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये अशा समक्ष सूचनाही संबंधितांना दिल्या. त्यामुळे आता आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा होऊन स्व. अक्षता म्हात्रे हिला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.