अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर १६ येथील महापालिका आरोग्य विभागाच्या नागरी आरोग्य केंद्राचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याची लेखी मागणी भाजयुमाचे नवी मुंबई जिल्हा चिटणिस सुनिकेत हांडेपाटील यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोपरखैराणे सेक्टर १६ येथे आरोग्य विभागाच्या नागरी आरोग्य केंद्राची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी असलेला माथाडी वर्ग व सभोवतालच्या अल्प, अत्यल्प, मध्यम उत्पन्न गटातील रहिवाशांना महापालिकेची आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तत्कालीन नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने अथक पाठपुरावा केला होता. तत्कालीन महापालिका आयुक्त व आरोग्य विभागाच्या दालनात सातत्याने मागणीमागील गांभीर्यही त्यांना पटवून दिले होते. देविदास हांडेपाटील यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने कामाला मंजुरी दिली व सुरुवातही केली. परंतु त्यादरम्यान कोरोनासारखी जागतिक महामारी आल्यामुळे या नागरी आरोग्य केंद्राचे काम मंदावले होते. समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी या कामाला गती यावी यासाठी महापालिका प्रशासनाला निवेदने दिली. आयुक्तांसोबत अनेक वेळा भेटी घेऊन चर्चा झाल्या. त्यानंतर या कामाला गती आली व आज हे नागरी आरोग्य केंद्र पूर्णत्वास आले आहे. कोपरखैराणेतील माता बाल रुग्णालयाचे काम सुरु असल्याने स्थानिक रहिवाशांना आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिकांना आरोग्य सुविधा परिसरातच उपलब्ध होण्यासाठी या नागरी आरोग्य केंद्राचे लवकरात लवकर लोकार्पण होणे आवश्यक आहे. या नागरी आरोग्य केंद्राचे स्थानिक आमदार लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करुन जनतेसाठी आरोग्य सुविधेचा शुभारंभ करावा,अशी मागणी सुनिकेत हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.