अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगर नोड व नेरूळ सेक्टर दोन-चार परिसरात आरोग्य शिबिराचे अभियान राबविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या दोन-अडीच महिन्यापासून नवी मुंबई शहरामध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला असून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळा आणि नवी मुंबईत साथीचे आजार हे गेल्या ३०-३५ वर्षांपासून समीकरणच बनलेले आहे. जुईनगर नोडमध्ये तसेच नेरूळ सेक्टर २-४ परिसरात मलेरिया, ताप, डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहे. जुईनगर व नेरूळ सेक्टर २-४ परिसरात साथीच्या आजाराचा उद्रेक होण्यापूर्वीच महापालिका आरोग्य विभागाने युद्धपातळीवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर, परिचारिका घरोघरी पाठवून तपासणी करण्यात यावी. साथीच्या आजाराबाबत, उपचाराबाबत, घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करावे. नेरूळ सेक्टर दोन-चार तसेच जुईनगर नोडमध्ये रहीवाशांसाठी आरोग्य शिबिराचे अभियान राबविण्याचे संबंधितांना मार्गदर्शन करण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.