मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदनातून घातले साकडे
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : मुंबई विद्यापिठातंर्गत असलेल्या वसतीगृहासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी विद्यापिठ प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी एमआयएमचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव आणि नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
मुंबई विद्यापिठाचा देशातच नाही तर जगभरात नावलौकीक आहे. या विद्यापिठातंर्गत येणाऱ्या वसतीगृहातील समस्यांबाबत, असुविधांबाबत तेथे वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १२ ऑगस्ट) उपोषण आंदोलन पुकारले. कलिना संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला होता. वसतीगृहातील गैरसोयी, निकृष्ठ व सुमार दर्जाची खानपान सेवा, नुकतीच करण्यात आलेली पाच हजार रुपयांची दरवाढ याविरोधात नाराजी व संताप व्यक्त करत विद्यार्थ्यानी आंदोलनाचा मार्ग स्विकारला. याशिवाय वसतीगृहाच्या भोजनगृहातील अस्वच्छता, मध्यवर्ती वाचनालयाच्या वेळा, वायफाय सुविधा, विद्यापिठातील कलिना संकुलातील पाणी समस्या याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विद्यार्थ्यांनी या समस्या व सुविधांबाबत वारंवार लेखी पाठपुरावा करुनही विद्यार्थ्याची दखल घेतली जात नाही. चर्चेसाठी बोलावतात, आश्वासने देतात, अंमलबजावणी होत नाही. हा घडत असलेला प्रकार योग्य नाही. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी असुविधा, समस्या सोडविण्यासाठी उपोषण आंदोलन करावे लागणे, हे चित्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला व गौरवशाली परंपरेला भुषणावह नाही. समस्येचे गांभीर्य पाहता, आपण तातडीने मुंबई विद्यापिठाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.