सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : पामबीच मार्गाला सारसोळे जंक्शन ते वजराणी स्पोर्टस क्लबपर्यत असलेल्या सर्व्हिस रोडवर तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
पामबीच मार्गालगत नेरूळ सेक्टर सहा येथील सारसोळे जंक्शन ते नेरूळ सेक्टर २४ परिसरातील वजरानी स्पोर्टस क्लबपर्यत असलेल्या सर्व्हीस रोडवर सकाळी व संध्याकाळी लोक मोठ्या संख्येने चालण्यासाठी येत असतात. गेल्या काही दिवसापासून या सर्व्हिस रोडवर चालण्यासाठी येणाऱ्या लोकांची लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दुचाकीवरुन येणारे भामटे ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांच्या हातातून, खिशातून मोबाईल हिसकावून पलायन करत आहेत. या घटना दिवसाउजेडी तसेच सांयकाळी झाल्या आहेत. लोकांनी दमदाटी करत, हाणामारी करत दुचाकीवरुन येणारे भामटे मोबाईल चोरुन नेत आहेत. तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. नेरूळ सेक्टर सहामधील प्लॉट १५ वरील शिवम सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून नवीन रिक्षा चोरीस गेली आहे. अनेक किराणा मालाच्या दुकानासमोरून दुधाच्या पिशव्याही नियमितपणे चोरीला जात आहेत. अशा घटनांनी स्थानिक रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी आपण या सर्व्हिस रोडवर तसेच नेरूळ सेक्टर सहाच्या अंर्तगत भागात पोलीस गस्त सकाळी व सांयकाळी तसेच रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढवण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.