दुसऱ्या टप्प्यातही ७८ हजाराहून अधिक महिलांची पडताळणी पूर्ण झाल्याने त्यांनाही मिळणार योजनेचा लाभ
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या नियोजनानुसार पडताळणी प्रक्रियेअंती नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून १.२५ लाखाहून अधिक अर्ज पात्र झाले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५० हजाराहून अधिक पात्र महिलांच्या बॅंक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या लाभाची प्रतिमहा १,५०० रुपये दोन महिन्यांची ३ हजार रुपये रक्कम जमा झालेली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील ७८ हजारहून अधिक महिलांची लाभ रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने योजनेचे अर्ज भरण्यासोबतच विहित वेळेत अर्ज निकाली निघावेत यादृष्टीने समांतर पध्दतीने अर्ज पडताळणीची प्रक्रिया व्हावी याकरिता मुख्यालय स्तरावर अर्ज पडताळणीसाठी तातडीने दोन वॉर रूम स्थापित करण्यात आल्या व त्या ठिकाणी ३ शिफ्टमध्ये २४ तास काम होईल अशा प्रकारे कर्मचा-यांची व त्यावर पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली. पडताळणीचे काम नियोजनबध्दरित्या सुरू झाल्यानंतर विहित वेळेत पडताळणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने समाजविकास विभागाच्या वतीने परिमंडळ व विभाग कार्यालयांच्या सहकार्याने गती देण्यात आली. अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यातील ९९% टक्यांहून अधिक अर्ज छाननीचे काम पूर्ण करण्यात आले असून नव्याने प्राप्त होत असलेल्या अर्ज छाननीचे कामही सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात ५० हजाराहून अधिक महिलांची अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांची लाभ रक्कम जमा झाली असून दुसऱ्या टप्प्यातही नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर एकूण ८५ हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७८ हजारहून अधिक अर्ज लाभासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामधील साधारणत: ५ हजार अर्जांबाबत संबंधित लाभार्थी महिलांच्या मोबाईलवर अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत संदेश पाठविण्यात आले असून सदर कागदपत्रांची पूर्तता संबंधित लाभार्थी यांनी त्वरीत करावी असे सूचित करण्यात आले आहे.
सदर योजनेचा लाभ सर्व पात्र महिला यांना घेता यावा व त्यासाठी अर्ज सादर करता यावा याकरीता महाराष्ट्र शासनाने माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता दिलेली आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या महिलांनी सदर योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत अर्ज दाखल केलेला नाही, त्यांनी अर्ज दाखल करुन घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.