राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी पालिका आयुक्तांकडे मागितली दाद
नवी मुंबई : महापालिका नेरूळ विभाग कार्यालयातून मृत्यू प्रमाणपत्रास होत असलेल्या विलंबाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून समस्या मांडत समस्येचे निवारण करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयात मृत्यू प्रमाणपत्राबाबत सावळागोंधळ सुरु असून मृताचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. मृत माणसाचे नातेवाईक व घरातील सदस्य आधीच शोकाकुल असतात. मृतानंतर त्याच्या पश्चात शासकीय कामासाठी व अन्य व्यवहारासाठी मृत्यू प्रमाणपत्राची पावलापावलावर गरज असते. नेरूळ विभाग कार्यालयात मृत्यू झाल्यानंतर दोन महिने उलटले तरी मृत्यू प्रमाणपत्र मिळत नाही. घरात नवरा मेलेला, व्यवहारासाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असल्याने विधवा महिला नवरा मेल्याचे दु:ख कवटाळत विभाग अधिकारी कार्यालयात दोन महिने हेलपाटे मारत आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. कधॅी माणसे नाहीत, माणसे इतर विभागात टाकली आहेत. सर्व्हर डाऊन आहे. नंतर या अशी उत्तरे देत आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासनाला हा प्रकार शोभनीय नाही तसेच भूषणावह नाही. मृत्यू प्रमाणपत्राची पावलापावलावर गरज असताना इतका विलंब का लागत आहे? माणसांना हेलपाटे का मारावे लागत आहे? आपण स्वत: या समस्येचे गांभीर्य ओळखून या प्रकाराची चौकशी करावी आणि संबधितांना तात्काळ मृत्यू प्रमाणपत्र देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.