नवी मुंबई : डासांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सानपाडा नोडमधील सानपाडा कॉलनी, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबई जिल्हा माजी उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा कॉलनी, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरातील रहीवाशी डासांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. पावसाळा कालावधीत या परिसरात साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने पहावयास मिळाले. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. नवी मुंबईतील घरगुती, सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लोक येत आहेत. येथील डासांच्या त्रासाने शहरात येणारे पाहूणे, नातेवाईकही त्रस्त झाले असून यामुळे नवी मुंबई शहराची प्रतिमा डासांचे शहर अशी निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे डासांमुळे निर्माण झालेले साथीच्या आजाराचे सावट, सुरु असलेला गणेशोत्सव पाहता सानपाडा कॉलनी, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसरात डास निर्मूलनासाठी तातडीने धुरीकरण अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.