मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून चांगलीच खणाखणी सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून दावे प्रतिदावे केले जात असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच गणेशोत्सव सुरू असल्याने मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. सोमवारी दुपारी अमित शाह लालबागच्या दर्शनाला पोहोचणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये महायुतीच्या जागावाटपावरून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमित शाह मुंबईमध्ये पोहोचताच भाजप नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे भाजपने विधानसभेसाठी किमान १६० जागा लढायला हव्यात, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे भाजप आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदरात किती जागा पाडून घेणार? याकडे लक्ष असेल. लवकरात लवकर विधानसभेच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्याकडे महायुतीचा कल आहे. रविवारी रात्री भाजपच्या नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला चांगलं यश मिळालं असलं, तरी भाजप कार्यकर्त्यांना त्यामध्ये वाटा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून जागांचा आग्रह झाला तरी ताकद पाहूनच निर्णय घ्यावा अशी भूमिका भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी घेतल्याच्या समजते. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुद्धा ताकदीचा सुद्धा अंदाज घ्यावा असाही कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तथापि, यासंदर्भात जी चर्चा झाली ती अनौपचारिक होती असेही भाजपकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी अमित शाह गणरायाचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर भाजप नेते आशिष शेलार यांच्या निवासस्थानी सुद्धा गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. अमित शाह यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे. दरवर्षी अमित शाह यांचे कुटुंबीय ‘लालबागच्या राजा’च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबईत येतात.महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेण्याची त्यांची ही तिसरी भेट आहे.