सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या गरीब व गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे ही योजना महानगरपालिकेमार्फत ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ वर्षाकरिता सदर शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून यामध्ये विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. नमुंमपा क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. नवी मुंबई क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. अशा विविध घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करण्यात येते.
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे –
वार्षिक उत्पन्न ८ लक्ष रुपये रक्कमेच्या आत असलेबाबतचा तहसिलदार, ठाणे यांचेकडील उत्पन्नाचा दाखला. (आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा/घटस्फोटित या घटकातील मुला-मुलींकरीता आवश्यक)
वास्तव्य पुरावा – मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती / निवडणूक ओळखपत्र/ मतदार यादीतील नांव/ पाणी पट्टी/ वीज बिल/ ३ वर्षाचा भाडे करारनामा/ पारपत्र (PassPort)/ रेशनकार्ड/ राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुक/ आधारकार्ड/ गॅस कनेक्शन पासबुक म्हणून पुरावा सादर करावा लागेल. (उपरोक्तपैकी कोणताही १ पुरावा). विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षातील शिक्षण पूर्ण केलेले असावे. सोबत मागील वर्षाची गुणपत्रिका जोडणे आवश्यक राहील. मागासवर्गीय असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांकडील जातीचा दाखला आवश्यक (मागासवर्गियांसाठी) विधवा महिलेच्या प्रकरणी सक्षम प्राधीका-यांनी दिलेला तिच्या पतीचा मृत्यू दाखला/घटस्फोटीत महिलेच्या बाबतीत घटस्फोटाबाबत मा.न्यायालयाचे आदेश जोडणे अनिवार्य राहील.
(I) कुटूंबातील जमीन नवी मुंबई प्रकल्पासाठी (सिडको/एम.आय.डी.सी.) अधिग्रहण केलेबाबत भूसंपादन अधिकारी, ठाणे यांची अॅवार्ड कॉपी व नमुना सातबारा किंवा स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी, ठाणे यांचा दाखला (II) नोटरी केलेला वंशावळ दाखला जोडणे आवश्यक राहील. (प्रकल्पग्रस्तांच्या मुलांकरिता)
नमुंमपा आस्थापनेवर कंत्राटी कामगार म्हणून काम करत असलेबाबत नमुंमपा ओळखपत्र व नमुंमपा कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र (सफाई कामगारांच्या मुलांकरिता)
अर्जदाराचा पालक नोंदणीकृत मालक / स्वयंसेवी संस्थेचा दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगार असलेबाबतचा पुरावा. (दगडखाण/बांधाकाम/रेती/नाका कामगार यांचे मुलांकरिता). पाल्याचे ठाणे व नजिकच्या जिल्हयातील स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असलेल्या खात्याचे बँक पासबुक / धनादेश यापैकी एकाची छायांकित प्रत. पाल्याचे स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असलेले खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. आई – वडील दोघांचे आधार कार्ड/ पालकाचे आधारकार्ड व असल्यास पॅनकार्ड तसेच पाल्याचे आधारकार्डची छायांकित प्रत आवश्यक.
योजनेच्या अटी व शर्ती –
विद्यार्थी मागील वर्षाच्या वार्षिक परीक्षेत किमान ६५% गुण (SGPA ७.२५) किंवा अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण असावा. (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांकरिता)
विद्यार्थी मागील वर्षाच्या परीक्षेत किमान ६०% गुण (SGPA ६.७५) किंवा अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण असावा. (मागासवर्गीय लाभार्थ्यांकरिता)
नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेकरिता अर्ज करु शकत नाहीत.
ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आरटीईअंतर्गत झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना महापालिकेमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. पाल्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे व ते आधारकार्डशी लिंक असावे. पाल्याचे स्वत:चे बँक खाते नसल्यास किंवा आधारकार्ड लिंक नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. अर्जासोबत अलिकडील काळात काढलेले पालक व पाल्याचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो लावणे आवश्यक राहील. लाभार्थी कुटूंबाने या समान कारणांसाठी इतर कोणत्याही शासकीय / अशासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे स्वसाक्षांकित केलेली असावीत. एका कुटूंबातील फक्त दोन पाल्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल. अशाप्रकारे विविध घटकाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजनेकरिता ०७ सप्टेंबर २०२४ ते दि. २०ऑक्टोंबर २०२४ पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.schemenmmc.com या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत. अंतिम दिनांकानंतर म्हणजेच दि. २० ऑक्टोंबर २०२४ नंतर प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.