सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : बुद्धीची देवता, सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे नवी मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत केले आहे. भाजपाच्या बेलापुर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील घरगुती गणपती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत नवी मुंबई प्लास्टीक मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला असून घरोघरी व सोसायटीमध्ये गणपती दर्शनाला जाऊन आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ‘कापडी पिशव्यांचे’ वाटप करून ‘प्लास्टिक मुक्त’ नवी मुंबई करण्याचा संदेश देत आहे. आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, जेव्हा जेव्हा महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी किंवा नंतर गटार नाले साफ केले जातात. त्यात सर्वाधिक प्रमाणात प्लास्टीक पिशव्या व प्लास्टीकच्या वस्तुच आढळतात. पावसाळ्यात जिथे जिथे पाणी भरते, त्या ठिकाणी ही बऱ्याचदा प्लास्टीकमुळेच नाले हे तुंबले जातात. त्यामुळे नवी मुंबईकरांनी आता प्लास्टीकच्या पिशव्या वापरणे बंद करावे असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांना केले आहे.
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ही नवी मुंबई प्लास्टीक मुक्त अभियानाअंतर्गत आपल्या गणेश मंडपांशेजारी प्लास्टीक मुक्तीचे प्रबोधनात्मक बॅनर व देखावे उभारावे आणि या चळवळीत सहभागी होण्यासाठी कळकळीची विनंती ही केली आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यातर्फे नवी मुंबईतील मागणी करणाऱ्या सर्व गणेश मंडळांना सुंदर आणि टिकाऊ कापडी पिशव्यांचे वाटप ही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर गावातील रुपेश दिवेकर, प्रकाश मुकादम, उषा दत्त तसेच सीवूडस येथील सागर दर्शन सोसायटी, एकविरा रिक्षा चालक-मालक संघटना, बल्लाळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे गणपती बाप्पाचे दर्शन घेत कापडी पिशव्यांचे वाटप केले. स्वच्छ नवी मुंबई – सुंदर नवी मुंबई – प्लास्टीकमुक्त नवी मुंबई, प्लास्टिकमुक्त नवी मुंबईच्या निश्चयामध्ये सामील व्हा, असे आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी केले.