सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थान समिती यांच्या विविध मागण्या घेऊन शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी ‘आहे त्या स्थळी’ गरजेपोटी बांधलेली वाढीव घरे कायमस्वरूपी करण्याचा शासन आदेश लवकरच निघेल असे सिडको आणि शासन यांनी आश्वासित केल्याची माहिती विजय नाहटा यांनी दिली.
यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले की, नवी मुंबईतील व्यापारी, भूमिपुत्र, विविध देवस्थानचे प्रतिनिधी यांचे प्रलंबित प्रश्न घेऊन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघम यांच्या सोबत बैठक झाली. त्यात प्रामुख्याने नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली वाढीव घरे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय लवकरच निकाली निघेल, असे उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे पूर्वीच्या मंत्रिमंडळात तत्कालीन नगरविकास मंत्री असताना स्थानिक भूमिपुत्रांनी ‘आहे त्या स्थळी’ बांधलेली वाढीव घरे नियमित करण्याचा शासकीय आदेश काढला होता. मात्र त्यामध्ये काही त्रुटी असल्याने घरे कायमस्वरूपी करण्याच्या प्रक्रियेला गती येत नव्हती. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शासकीय आदेशामधील त्रुटी तात्काळ दूर करण्याच्या सूचना त्यांनी सिडको एमडी यांना देऊन सुधारित प्रस्थाव शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले होते. मीही शासनाचे सचिव, उपसचिव यांच्याशी बोलून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त यांना सदर शासकीय आदेशानुसार स्थानिकांना व्यावसायिक लाभ मिळत नाही. २५० मिटरचे जाचक बंधन, वारसा हक्क नियम आदिमध्ये अडचणी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ निर्णय घेत शासकीय आदेशामधील अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या असून सुधारित शासकीय आदेश लवकरच निगर्मीत करणार असल्याचे बैठकीत एम डी यांनी सांगितले असल्याचे नाहटा यांनी स्पष्ट केले. सिंघम यांनी अतिशय चांगला प्रस्ताव पाठवला आहे. प्रकल्पग्रस्तांची घरे आहे, तिथे कायमस्वरूपी करण्याचा शासकीय आदेश लवकरच निघेल असे आश्वासन बैठकीत दिल्याचे विजय नाहटा यांनी सांगितले.
याशिवाय सिडको आकारत असलेले घर (ट्रान्सफर) हस्तातरण शुल्क नियमानुसार नसून तो रद्द करण्यात यावा, नवी मुंबईतील २८५ व्यापाऱ्यांना सिडकोच्या योजनेतील घरे उपलब्ध करून द्यावेत, द्रोणागिरी प्रकल्प्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भूखंड देण्यात यावेत, विविध मंदिर देवस्थान समितीला अल्प दरात भूखंड उपलब्ध करून द्यावेत आदि मागण्याचे निवेदन बैठकीत सिडको एम डी यांना देण्यात आल्यावर या मागण्यांबाबत सिडको एम डी सिंघम यांनी सकारात्मक चर्चा करत लवकरच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, शहरप्रमुख विजय माने, नवी मुंबई व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रमोद जोशी, सिटीझन फोरम चे सतीश निकम, हौसिंग फेडरेशनचे सचिव भास्कर म्हात्रे, सुनिल छाजेड यासह विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.