माझ्या मतदारसंघाचा आमदार असा असावा
माझा आमदार हा शिक्षित असावा, जेणेकरुन आपल्या मतदार संघामधल्या त्यांना पत्रव्यवहार करुन केलेल्या समस्या, तक्रारी, अडीअडचणी वेळीच समजुन मार्गी लाऊ शकतो. माझा आमदार चारित्र्यहिन नसावा, जेणेकरुण मतदारसंघामधल्या एकाद्या महीलेसोबत काही कौंटुबिक हिंसाचार, अन्याय किंवा काही दुर्दैवी घटना घडली तर ती न्याय मागण्यासाठी आमदारांकडे जाताना तिच्या मनात काही प्रश्न, शंका उपस्थित राहणार नाही. माझा आमदारच कलंकित आहे? हा मला न्याय देणार का? असा संभ्रम संबंधित महिलेच्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता असेल.
माझ्या आमदाराची गुन्हेगारी पाश्वर्भूमी नसावी, जेणेकरुन मतदारसंघामध्ये गुंडगिरी, दमदाटी करुन हफ्ते वसुली करणे या सर्व गोष्टींना थारा राहनार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महीलांमध्ये असुरक्षिततेची भावना राहणार नाही. माझ्या मतदारसंघामध्ये खास करुन गावगावठाणाच्या भागामध्ये आजही पाण्याची समस्या खुप मोठी आहे. स्वतः च्या मालकीचे मोरबे धरण असले तरी आजही गाव गावठाण भागात खुप कमी दाबाने पाणी येत आहे. मुळात नवी मुंबई वसवण्यासाठी भूमिपुत्रांनी आपली सुपिक जमीन सरकारला दिली आहे. त्यामुळे माझा आमदार हा भूमिपुत्रांसाठी नेहमी तात्पर्यांने कुठल्याही प्रसंगामध्ये सोबत उभा राहणारा असावा.
आज नवी मुंबईमधील अनेक गावांना क्रिडांगण ( मैदान ) नाहीत, जी मैदाने आहेत, त्या मैदानावर फारशी क्रिडाविषयक सुविधा नाहीत, अनेक मैदाने तर आजही अविकसित अहोत. ती समस्या दूर करण्यात यावी, जेणेकरुन मुलांना विविध खेळांचा आनंद घेता येईल. मैदाने सुस्थितीत असल्यास लहान मूले, तरुण हे मैदानी खेळाचा आनंद घेतील, कोणीही वंचित राहणार नाही.
माझा आमदार हा शिक्षणाला महत्व देणारा असावा. कारण आता प्ले स्कूल, नर्सरीपासून ते स्कूल, कॉलेजची फी बघाल तर ५० हजारांपासुन ते लाखोंच्या घरात आहे. पालकांसमोर हाच चिंतेचा विषय आहे. आपल्या मुलांना शिक्षण देण्याची पालकांची तळमळ असली तरी महागडे शिक्षन उपलब्ध कसे करुन द्यायचे, या समस्येने नवी मुंबईकर पालक चिंतातूर आहे. शिक्षण संस्थांकडून उकळण्यात येणाऱ्या भरमसाठ फीवर नियत्रंण ठेवणारा आज आमदार आम्हाला हवा आहे. आज नवी मुंबईमध्ये जो सफाई (कंत्राटी) कामगार आहे, जो आज १५-२० वर्षापासुन निस्वार्थीपणे नवी मुंबईची स्वच्छता करत आहेत. बकालपणा नष्ट करत आहेत. अशा कामगारांना न्याय हक्क मिळवून देणारा माझा आमदार असावा. फक्त मोठमोठ्या अधिकाऱ्यांसाठी त्यांना प्रमोशन, त्यांना मलईदार विभागामध्ये बदलीसाठी भांडणारा नसावा. कारण एकीकडे सफाई कंत्राटी कामगारांच्या जीवावर आपल्याला देशामध्ये स्वच्छतेत नवी मुंबईला एक नंबरचा पुरस्कार मिळतो आणि दुसरीकडे आजही त्या कामगाराना आपल्या न्याय हक्कासाठी मोर्चे आंदोलने करावी लागतात, ही नवी मुंबईसाठी शरमेची बाब आहे. माझा आमदार विधानसभेमध्ये आवाज उचलन नवी मुंबईकरांना न्याय देणारा असावा.
- मनोज विवेक डोंगरे
आग्राळी गाव, नवी मुंबई
संपर्क : 📞 ९८६७९४७३२३