श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई (प्रतिनिधी) : बुधवार, दि. २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूका झाल्या. नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत शनिवार, दि. २३ नोव्हेंबरला आता मतमोजणीही होणार आहे. एक्झिट पोलचेही निकालही जाहीर झाले आहेत. तथापि निवडणूकीतील उमेदवारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना व मतदारसंघातील रहीवाशांनाही त्या एक्झिट पोलवर विश्वास नाही. बेलापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नेरूळ येथील आगरी-कोळी भवनामध्ये तर ऐरोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ऐरोली सेक्टर ५ मधील झेनिथ स्कूलमध्ये होणार आहे.
ऐरोली विधानसभेमध्ये महायुतीचे भाजपा उमेदवार आमदार गणेश नाईक, अपक्ष उमेदवार व शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले, महाविकास आघाडीचे उबाठा गट शिवसेनेचे उमेदवार एम. के. मढवी, अंकुश कदम यांच्यात प्रामुख्याने लढत झाली असून बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या भाजपा उमेदवार आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार संदीप नाईक, मनसेचे गजानन काळे, शिवसेना शिंदे गटाचे व सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे विजय नाहटा यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
मनसे उमेदवार गजानन काळे यांनी आक्रमक प्रचार केला असला तरी त्यांचा अधिकाधिक भर सोशल मिडियावर राहीला आहे. मनसेची पक्षबांधणी नसल्याचा गजानन काळेंना फटका बसला आहे. गेली अनेक वर्षे मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष असतानाही गजानन काळेंना नवी मुंबईत संघटना बांधणी करता आलेली नाही व पदाधिकारी नियुक्त करता आले नाही. भाजपाच्या उमेदवार आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या गेली १० वर्षे आमदार असल्याचा व त्यांच्यासाठी आरएसएस मैदानात जोरदारपणे उतरल्याचा त्यांना मतदान खेचण्यात फायदा झाला आहे. अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून हिंदी भाषिकांशी मते खेचण्यात ते यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे संदीप नाईक यांनी प्रत्यक्ष मतदारांना वन टू वन संपर्क साधण्यावर भर दिला होता. महाविकास आघाडी असल्याने शिवसेना शाखा, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यालय, कॉग्रेस मुख्यालय येथे सातत्याने भेटी देवून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रचारात वार्डावार्डात भेटी दिल्या. अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी जोरदार प्रचार अभियान राबविले असले तरी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची फळी नसल्याचा त्यांना काही प्रमाणात फटका बसला. या मतदारसंघात अन्य उमेदवार असले तरी खरी लढत आमदार मंदाताई म्हात्रे, संदीप नाईक व विजय नाहटा यांच्यातच झाली असल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
ऐरोली मतदारसंघात खरी लढत भाजपाचे उमेदवार आमदार गणेश नाईक व अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्यातच झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार एम. के.मढवी आणि अंकुश कदम यांना कितपत जनाधार मिळाला आहे, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. बेलापूर मतदारसंघात आमदार मंदाताई म्हात्रे व संदीप नाईक यांच्या विजयाबाबत ठिकठिकाणी मोठ्या पैंजाही लागल्या आहेत. आता बेलापूर व ऐरोलीचा आमदार कोण होणार याचे उत्तर मतमोजणीनंतर शनिवारी दुपारी एक वाजेपर्यत समजणार असले तरी नवी मुंबईमध्ये आमदार कोण होणार, कोण पराभूत होणार, कोणाला किती मते मिळणार याचीच जोरदार चर्चा सुरु आहे,