श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीचा प्रचार संपण्यास आता जेमतेम दीड दिवसाचा कालावधी राहिलेला असताना बेलापूर मतदारसंघातील चुरशीच्या लढतीकडे ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या उमेदवार आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार संदीप नाईक, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते व अपक्ष उमेदवार विजय नाहटा आणि मनसेचे उमेदवार गजानन काळे अशी चौरंगी लढत होत आहे. नेरूळ सेक्टर चार परिसर आणि नेरूळ पूर्व परिसरात महायुतीच्या उमेदवार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मारलेली मुसंडी महाआघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्यासह महाआघाडीसाठी धोक्याची घंटा ठरु शकते.
नेरूळ सेक्टर चार परिसर हा उच्चभ्रूंचा व सुशिक्षितांचा परिसर म्हणून ओळखला जात आहे. या मतदारांवर भाजपाचा कमालीचा प्रभाव आहे. वीस ते पंचवीस दिवसाच्या प्रचार कालावधीत या विभागातील भाजपाच्या प्रभावाला शह देणे महाविकास आघाडीला जमलेले नाही. नेरूळ सेक्टर चार परिसरात माजी आमदार संदीप नाईक यांच्या सभोवताली वावरणारे सुनील सुतार, शिवसेनेचे प्रल्हाद पाटील, कॉग्रेसचे रविंद्र सावंत, राष्ट्रवादीच्या माजी ज्येष्ठ नगरसेविका स्नेहा पालकर यासह महाविकास आघाडीतील अन्य रथी-महारथींचे निवासी वास्तव्य आहे. या सर्वांचे येथे निवासी वास्तव्य असतानाही येथील मतदान मोठ्या प्रमाणावर मंदाताई म्हात्रे यांना होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील निवासी रथीमहारथीच्या कार्यक्षमतेवर निवासी भागातच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने माजी आमदार संदीप नाईक यांच्या विजयाच्या समीकरणाला अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सौ. सुहासिनी नायडू यांचा अपवाद वगळता भाजपाचे स्थानिक पातळीवर अन्य कोणी प्रभावशाली नसतानाही येथे भाजपाला चांगल्या प्रकारे आघाडी मिळण्याची शक्यता आहे.
नेरूळ पूर्व परिसरात नेरूळ एलपी पासून ते टोकाच्या भीमाशंकर सोसायटीपर्यत पसरलेल्या विभागातही महाआघाडीच्या तुतारीच्या तुलनेत कमळाचाच प्रभाव स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. नेरूळ पूर्व परिसरात कमळाखालोखाल काही ठिकाणी अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांचा प्रभाव दिसत असून या ठिकाणी कमळ व तुतारीच्या ऐवजी शिट्टीचा आवाज घुमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेरूळ पूर्व परिसरात माजी महापौर जयवंत सुतार, महिला नेत्या सौ. माधुरी सुतार, जयेंद्र सुतार, मीरा पाटील, शिल्पा कांबळी, सुरेश शेट्टी, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांचा प्रभाग असून भाजपाचे कोणीही या ठिकाणी फारसे मातब्बर प्रस्थ नाही. शिवसेनेचे मनोज इसवे, घोसाळकरही, कॉंग्रेसचे संतोष शेट्टी, दत्ता जाधव, राष्ट्रवादीचे गणेश पालवे, दिनेश गवळी यासह महाविकास आघाडीतील अनेक जण या नेरूळ पूर्वला आहेत. येथील मतदारांचा कल भाजपाच्या बाजूने दिसत असल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीकडीला पर्यायाने उमेदवार संदीप नाईक यांच्यासाठी मतदानापूर्वीचा दीड दिवस प्रचार अभियान राबविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.
महाविकास आघाडीकडे रथी-महारथींची फौज आहे, तुलनेने भाजपाच्या मंदाताई म्हात्रे यांच्याकडे फारसे प्रभावी नेतेमंडळी स्थानिक भागात नाहीत. अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांच्याकडे संजय भोसलेसह तीन-चार जण वगळता अन्य फारसे प्रभावी नाही. २०१४च्या विधानसभा निवडणूकीत गणेश नाईकांचा या मतदारसंघात निसटता पराभव झालेला असतानाही त्या पराभवापासून नेरूळ पूर्वमधील संदीप नाईक समर्थंकांनी, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बोध घेतलेला नाही. महाविकास आघाडीचा तळागाळात प्रचार न होता हायटेक प्रचार होत असल्याचे प्रचार अभियानामध्ये दिसत आहे. प्रचार संपण्यास आता अवघ्या दीड दिवसाचा कालावधी राहिल्याने नेरूळ सेक्टर चार परिसरात व नेरूळ पूर्व परिसरात महाविकास आघाडी कितपत मुसंडी मारते यावर बेलापूर मतदारसंघातील जय पराजयाची समीकरणे ठरणार आहेत.