नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघात नेरूळ पश्चिममधून महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांना जोरदार मतांची आघाडी मिळणार असल्याचे एकीकडे चित्र निर्माण झाले असतानाच दुसरीकडे नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावात महायुतीच्या उमेदवार आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचार यंत्रणेने मुसंडी मारल्याचे पहावयास मिळत आहे.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे मातब्बर प्रस्थ सुरज पाटील, माजी नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील, माजी नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार, शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी प्रल्हाद पाटील, शाखाप्रमुख इमरान नाईक, कॉग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे तसेच युवा ग्रामस्थ अमोल मेहेर अशी रथी-महारथींची फळी असताना आणि दुसरीकडे त्या तुलनेत मंदाताईच्या छावणीत तुलनेने तितके मातब्बर नसतानाही प्रदीप बुरकुल, गामी, माऊली विश्वासराव व सारसोळे गावातील युवकांनी मंदाताई म्हात्रे यांचा जोरदार प्रचार चालविला आहे. सेक्टर सहा परिसरात महायुतीला अजून फारसा शिरकाव मिळाला नसला तरी सारसोळे गावात मात्र मंदाताई म्हात्रे यांचा बोलबाला प्रचाराच्या टप्प्यात जोरदार सुरु आहे.
सारसोळे गावातील मासेमारी करणाऱ्या ग्रामस्थांना शिवडी-न्हावाशेवा पुलाबाबत भरपाई मंदाताई म्हात्रे यांनी मिळवून दिल्याने युवा ग्रामस्थांची फळी मंदा म्हात्रे यांच्या प्रचारयंत्रणेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली आहे. भाजपातून एक मोठा वर्ग राष्ट्रवादीत गेल्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे उरलेल्या पदाधिकाऱ्यांपुढे भाजपाच्या पाठीशी असलेला जनाधार निर्माण करण्याचे आवाहन पेलण्याचे काम प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून प्रदीप बुरकुल यांच्या माध्यमातून भाजपाकडून सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व अलीकडच्या काळात संदीप नाईक यांचे निकटवर्तीय सहकारी बनलेले महादेव पवार यांना विविध आमिष दाखविण्याचे (पालिका निवडणूक तिकिट व इतर) प्रयत्न स्थानिक भागातील मंदाताई म्हात्रे यांच्या निकटवर्तीयांकडून सुरु झाले आहेत. नेरूळ पश्चिममधून विक्रमी मताधिक्य देण्याचा शब्द महाआघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांना अनेकांनी दिला असून भाजपाने नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात प्रचारात मारलेली मुसंडी मतपेटीत कितपत उतरणार, याचे उत्तर २३ तारखेला मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीचे मातब्बर प्रस्थ सुरज पाटील, माजी नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील, माजी नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी महादेव पवार, शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी प्रल्हाद पाटील, शाखाप्रमुख इमरान नाईक, कॉग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे तसेच युवा ग्रामस्थ अमोल मेहेर आता संदीप नाईकांसाठी कितपत मेहनत घेतात व भाजपाच्या प्रचार यंत्रणेला कितपत तोंड देतात, हे येत्या तीन –चार दिवसात पहावयास मिळणार आहे.