सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या लोकोपयोगी कामांना जनतेपर्यंत पोहचविण्याचे व जनतेच्या विविध अडीअडचणी, सूचनांना महापालिका प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे अत्यंत महत्वाचे काम पत्रकारांमार्फत होत असल्याबद्दल आभार व्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी रूजविलेला पत्रकारितेचा वसा लिखित वर्तमानपत्रांपासून आजच्या डिजीटल माध्यमांच्या युगात समर्थपणे जपणा-या पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी सुसंवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, लेखा परिक्षक जितेंद्र इंगळे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी सर्व पत्रकारांकडून नियमितपणे प्रसिध्दीसाठी मिळणाऱ्या संपूर्ण सहकार्याबद्दल आभार मानले व बाळशास्त्री जांभेकर यांचा जीवनपट उलगडला.
महाराष्ट्रातील पहिले इतिहास संशोधक, लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक, महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सन १८३२ मध्ये ६ जानेवारीला मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी ब्रिटीश सत्ताधार्यां ना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये मराठी भाषेतील उभ्या स्तंभाच्या शेजारी त्याच मजकूराचा एक स्तंभ इंग्रजी भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’कारांनी पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता अत्यंत निष्ठेने व निस्पृह वृत्तीने आपले वृत्तपत्र चालवले.
अशा ‘दर्पण’च्या प्रकाशनदिनी अर्थात पत्रकारदिनी आचार्यांच्या प्रेरक स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित पत्रकारांपैकी विनायक पाटील, विनय म्हात्रे, दत्तात्रय सूर्यवंशी, स्वाती नाईक, यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत मनोगते व्यक्त केली. यावेळी विविध माध्यम प्रतिनिधी व कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.